सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी ७९ नव्या रुग्णांची भर पडली. सध्या एप्रिलमध्ये आढळून आलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट ‘एक्सबीबी.१.१६’ दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यातील वाढत्या रुग्णांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच ‘एक्सबीबी.१.१६’ व्हेरिएंटचे वाढते रुग्ण पाहता याला ‘कोविड-१९ व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ श्रेणीत ‘अपग्रेड’ केले आहे. नॅशनल ‘इन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’चा (नीरी) लॅबमध्ये जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंत एकूण दोन हजार ६५३ कोरोना नमुन्यांची ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आली.
- ९६ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’
नीरी लॅबचे डॉ. क्रिष्णा खैरनार यांनी सांगितले, या प्रयोगशाळेत कोरोना पॉझिटिव्ह ५१० नमुन्यांपैकी ९६ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. त्यापैकी नागपुरातील ६६, चंद्रपूरमधील १८ तर भंडारा जिल्ह्यातील १२ नमुने होते. यातील ७० नमुन्यांमध्ये ‘एक्सबीबी.१.१६’ तर १८ नमुन्यांमध्ये ‘एक्सबीबी.१.१६.१’ व्हेरिएंट आढळले. हे दोन्ही प्रकार अगदी सारखे आहे. एकूण नमुन्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त नमुन्यांमध्ये ‘एक्सबीबी.१.१६’ वर्चस्व आहे. जिल्हानिहाय अनुक्रमानेदेखील समान परिणाम दिसून आले. चंद्रपूरमधील एकूण ८९ टक्के नमुन्यांमध्ये ‘एक्सबीबी.१.१६’ आणि ‘एक्सबीबी.१.१६.१’, तर भंडारामधील ९२ टक्के नमुन्यांमध्ये ‘एक्सबीबी.१.१६’ आणि ‘एक्सबीबी.१.१६.१’ व्हेरिएंट आढळून आले.
-रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात कमी रुग्ण
संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले, कोरोनाचा या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्ण वाढत असले तरी घाबरण्याचे कारण नाही. बहुसंख्य रुग्णांना लक्षणेच नाहीत. काहींना सौम्य लक्षणे आहेत. परिणामी, फार कमी रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. यामुळे दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता नाही.