सुमेध वाघमारे -
नागपूर: कोरोनामुळे त्या माउलीने २७ वर्षीय मुलगा गमावला. परंतु दु:खाने खचून न जाता एक दिवस जिद्दीने ती उठली. थेट हॉस्पिटल गाठले. ‘मला पुन्हा मूल हवंय...’ असे सांगत डॉक्टरांचे पायच धरले. तिची इच्छाशक्ती पाहून डॉक्टरांनी उपचार सुरु केले आणि ५३ व्या वर्षी ती पुन्हा आई बनली. मुलाचा मृत्यू झाला, त्याच्या एक दिवस आधी, १४ एप्रिल रोजी तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मंदाकिनी विनोद मानके असे त्या आईचे नाव. एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाला. १५ एप्रिल २०२१ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्यातही त्या खचल्या नाहीत. वंध्यत्व आणि आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. संगीता ताजपुरिया यांच्याकडे गेल्या. मला पुन्हा आई व्हायचे आहे, असे सांगत कोणत्याही वैद्यकीय उपचाराला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. अडीच वर्षांपूर्वीच रजोनिवृत्ती झाली होती. पती विनोद एक निवृत्त शिक्षक. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह आहे. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता नव्हती. डॉ. ताजपुरिया यांनी उपचार सुरु केले. जुलैमध्ये डॉक्टरांनी यशस्वीपणे ‘आयव्हीएफ’ केले.
७७ वर्षीय आईलाही आनंद : मंदाकिनी यांच्या ७७ वर्षीय आईला मुलगी पुन्हा आई होणार हे लक्षात आल्यावर त्यांनी पहिल्या बाळंतपणासाठी जेवढे कष्ट घेतले नसतील त्याच्या दुप्पट कष्ट आपल्या मुलीसाठी घेतले.
इच्छाशक्तीमुळेच शक्य झाले- ‘लोकमत’शी बोलताना डॉ. ताजपुरिया म्हणाल्या, मंदाकिनी आरोग्य दृष्टीने फिट असल्याने औषधाने मासिक पाळी सुरू केली. प्रसूतीचा दिवस २५ एप्रिल २०२२ होता; परंतु त्यांनीच प्रसूतीची तारीख ठरवून ठेवली होती. २५ मार्च रोजी तपासणी केली असता गर्भातील पाणी कमी झाले होते. - सोबतच नाळ बाळाच्या गळ्याभोवती आल्याचे दिसले. फोनवरून संवाद साधत होते. आठवड्यातून एकदा रुग्णालयात बोलावून तपासत होते. - १३ एप्रिल २०२२ रोजी त्या रुग्णालयात आल्या. १४ एप्रिल रोजी सिझर झाले. इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारांमुळेच त्या पुन्हा आई होऊ शकल्या.