योगेश पांडे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या काही किलोमीटर त्रिज्येमधील परिसर ‘नो बीम झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांकडून वारंवार या नियमांचा भंग होताना दिसून येतो. विमानतळाजवळील ‘बीम लाइट’कडे पोलिसांचा नावापुरताच ‘वॉच’ असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने याबाबतीत पाहणी केली असता शनिवारी रात्री विमानतळाच्या रन-वेपासून एक किलोमीटरच्या परिसरातदेखील ‘बीम’चा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून आले. या प्रखर प्रकाशामुळे विमान अपघात होण्याचादेखील धोका असताना पोलिसांकडून कारवाईबाबत दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रात्रीच्या सुमारा विमानांचे ‘लॅंडिंग’ व ‘टेक ऑफ’ होत असते. असे करत असताना विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमात लावण्यात येणारे बीम लाइटमुळे विमानाच्या पायलटला असुविधा होते. यामुळे अपघात होण्याचा धोका लक्षात घेता विमानतळाच्या १५ किलोमीटर त्रिज्येतील (रेडिअस)मधील परिसर रात्रीच्या सुमारास ‘नो बीम झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस विभागाकडून दर दोन महिन्यांनी नवे निर्देश जारी करण्यात येतात; परंतु, विमानतळाजवळील भागात अनेक ठिकाणी अनेकदा नियमांचा भंग होत असल्याची काही नागरिकांची तक्रार होती.
‘लोकमत’ने या संदर्भात शनिवारी विमानतळ परिसरात पाहणी केली असता इंद्रप्रस्थ ले आऊट परिसरात ‘बीम’ दिसून आले. तेथील एका घरातील कार्यक्रमादरम्यान गच्चीवर दोन ‘बीम लाइट’ लावण्यात आले होते. हे ‘बीम’ काही किलोमीटर अंतरावरूनदेखील सहजपणे दिसून येत होते. रात्री उशीरापर्यंत ‘बीम’ सुरू होते; परंतु, कुठलीही कारवाई झाली नाही. असे प्रकार वारंवार होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषत: ऑरेंज स्ट्रीट, त्रिमूर्तीनगर, हिंगणा टी पॉईंट, जयताळा येथील वस्त्यांमध्ये पार्टी किंवा कार्यक्रमादरम्यान ‘हाय बीम’चा वापर होतो. यासंदर्भात सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
पायलट्सला होतो त्रास
रात्रीच्या वेळी विमानाच्या पायलटला एटीसी टॉवरकडून लाइटच्या रूपाने सिग्नल देऊन दिशा आणि लॅण्डिंगस्थळ दाखविण्यात येते. या पूर्ण प्रक्रियेला इन्स्टुमेंट लॅण्डिंग (आयएलएस) म्हणण्यात येते. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमात लावण्यात येणारे बीम लाइट समस्येचे कारण बनतात. विमानतळाच्या १५ किलोमीटर वायुक्षेत्रात सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत आकाशात बीम लाइट न सोडण्याचे निर्देश आहेत. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात बीम लाइट आकाशात फिरविल्यामुळे विमानाचा अपघात होऊ शकतो.
मनीषनगर, चिंचभुवन, रिंग रोड, जयताळ्यावर ‘फोकस’
नागपूर विमानतळावर चिंचभुवन किंवा जयताळा, प्रसादनगरच्या दिशेने ‘लॅंडिग’ किंवा ‘टेक ऑफ’ होते; परंतु, आजूबाजूला दाट वस्तीचा परिसर असून तेथे काही पार्टी हॉल्सदेखील आहेत. अनेकदा रात्रीच्या सुमारास निर्देशांचे उल्लंघन करून बीमचा उपयोग करण्यात येतो. इंद्रप्रस्थ ले आऊटमध्ये ज्या ठिकाणी ‘बीम’चा वापर होत होता ती जागा विमानतळाच्या भिंतीपासून एका किलोमीटरच्या आतच आहे हे विशेष.