लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मिस वर्ल्ड स्पर्धेतील काही स्पर्धकांनी नागपुरात येत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मिस वर्ल्ड स्पर्धेत देशविदेशातील स्पर्धक सहभागी होतात व अशाप्रकारे या स्पर्धकांनी नागपुरात भेट देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
७१ वी मिस वर्ल्ड स्पर्धा २८ वर्षांच्या कालावधीनंतर भारतात होत आहे. ९ मार्च रोजी ग्रँड फिनाले आहे. त्याअगोदर या स्पर्धक भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देत आहेत. गुरुवारी या स्पर्धेतील सहा स्पर्धक तरुणींनी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिआ मोरले यांच्यासह स्मृति मंदिर परिसराला भेट दिली. त्यांनी यावेळी संघ कार्य व सेवाप्रकल्पांबाबत जाणून घेतले. त्यांनी यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या सामाजिक कार्य अनुभवदेखील सांगितले. स्मृतिमंदिर परिसरातील संघाचे अधिकारी विकास तेलंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
मिस वर्ल्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरदेखील ही छायाचित्र शेअर करण्यात आली. या स्पर्धकांमध्ये कॅरोलिना तेरेसा बैलावस्का, सिल्विहा व्हॅनेस्सा पोन्से डे लिओन सांचेझ, जेसिका गॅगेन, सिनी सदानंद शेट्टी, पॉला सांचेझ, क्रिस्टिन राईट, क्लाऊडे मनागाका मशेगो व व्हिक्टोरिआ जोसेफिन्मे डी सोर्बो यांचा समावेश होता. संघस्थानी येऊन मला आनंद होत आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांत त्यांचे कार्य जाणून मी प्रभावित झाली अशी भावना भारताची स्पर्धक सिनी शेट्टी हिने व्यक्त केली. या स्पर्धेत १२० देशांच्या स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धक तरुणींनी चंद्रपुरात आयोजित ताडोबा फेस्टिव्हलमध्येदेखील सहभाग नोंदविला.