नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीने हफ्तावसुलीसाठी एका इसमाला जीवे मारण्याची धमकी दिली व भर दिवसा तलवारीचा धाक दाखवत घाबरविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्वत:ला ‘भाई’ समजणाऱ्या आरोपीला बेड्या घातल्या असल्या तरी भरदिवसा तलवार घेऊन फिरण्याची हिंमत दाखविल्यामुळे पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रिंस प्रमोद चहांदे (२८, भीमनगर झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे. २७ मे रोजी रवी समर्थ (२४) हा तरुण बाळाभाऊ पेठेतील घरी असताना प्रिंस तेथे गेले व त्याने रवीला आवाज देत घराबाहेर बोलविले. तू खूप पैसे कमवत असून मला आता दर महिन्याला पैसे द्यावे लागतील. जर पैसे दिले नाही तर तूझा खून करेन, अशी त्याने धमकी दिली. या प्रकारामुळे रवी घाबरला व प्रिंसने दारूसाठी मागितलेले पाचशे रुपये मुकाट्याने दिले.
३० मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास प्रिंस परत रवीच्या घरी आला व त्याने दारू पिण्यासाठी पाचशे रुपये मागितले. रवीने पैसे नसल्याचे सांगितल्यावर प्रिंसने लोखंडी तलवार काढून अश्लिल शिवीगा केली व मी जेलमध्ये गेलो तरी कुणालाही मारू शकतो, असे म्हणत रवीला मारहाण केली. त्यानंतर त्याने त्याची दुचाकी पाडून नुकसान केले. जीवे मारण्याची धमकी देत प्रिंस तेथून निघून गेला. दहशतीत आलेल्या रवीने पाचपावली पोलीस ठाणे गाठले व आपबिती सांगितली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिंसविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.