- योगेश पांडेनागपूर : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जडणघडण झाली तीच मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून. १९४० च्या दशकापासून नारायणराव तरटेंच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक म्हणून सुरू केलेला प्रवास पंतप्रधानपदापर्यंत येऊन पोहोचला. स्वयंसेवक दशेपासूनच अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील वेगळेपणाची जाणीव संघश्रेष्ठींना झाली होती. गोळवलकर गुरूजींच्या मार्गदर्शनात अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील नेतृत्वाला आकार मिळायला सुरुवात झाली हे विशेष.संघामध्ये व्यक्तीपूजेला स्थान नाही व अटलबिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर संघसंस्कारांचे पालन केले. कधीही बडेजावपणा न मिरविता सर्वसाधारण स्वयंसेवकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. अटलजींमधल्या कवीलादेखील संघाच्या शिक्षा वर्गांमध्ये कमालीचे प्रोत्साहन मिळाले. अटलबिहारी वाजपेयी हे स्वत:ला सामान्य स्वयंसेवक मानत असले तरी स्वयंसेवक त्यांना मार्गदर्शकच मानत असत. संघाचे स्थापना वर्ष आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मवर्ष १९२५ हेच होते. लखनौ, ग्वाल्हेरसह देशातील विविध भागांमध्ये त्यांनी विस्तारक व प्रचारक असताना संघकार्याचा विस्तार केला. संघाच्या प्रत्येक सरसंघचालकांशी त्यांचा संबंध आला होता. संघशिक्षा वर्गात अटलबिहारी वाजपेयी यांचे असणे म्हणजे स्वयंसेवकांसाठी पर्वणीच असायची. त्यांचे अमोघ वक्तृत्व, अंगावर रोमांच आणणाऱ्या कविता ऐकण्यासाठी स्वयंसेवक आतुर असायचे. पंतप्रधानपदी असतानाही अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील स्वयंसेवकाचे वारंवार दर्शन व्हायचे.गोळवलकर गुरुजींसमवेत जिव्हाळा‘हिंदू तन मन हिंदू जीवन...’ ही त्यांची गाजलेली कविता त्यांनी दहावीत असताना १९४२ साली लिहिली होती. लखनौ येथे झालेल्या द्वितीय वर्ष संघ शिक्षा वर्गात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यासमोर ही कविता वाचून दाखविली होती.तेव्हापासूनच गोळवलकर गुरुजी त्यांचे प्रशंसक झाले होते. दोघांच्या वयामधील अंतर जास्त असले तरी जिव्हाळा घनिष्ठ होता. अगदी गुरुजींच्या मृत्यूच्या एक दिवसअगोदर अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हादेखील त्यांनी शाब्दिक कोट्या करत वातावरणातील गंभीरता कमी केली होती.अटलबिहारी वाजपेयी ज्यावेळी पहिल्यांदा अमेरिकेला गेले, तेव्हा तेथील स्वयंसेवकांसाठी आवर्जून गुरुजींचा संदेश घेऊन गेले होते, अशी माहिती माजी विश्व विभाग संयोजक व विज्ञान भारतीचे पालक शंकरराव तत्ववादी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
Atal Bihari Vajpayee : संघ संस्कारांतून घेतला ‘अटल’ वसा, संघ शिक्षा वर्गात घडला स्वयंसेवक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:51 AM