नागपूर : हुडकेश्वर परिसरातील एटीएम फोडून १.२६ लाखांची चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हेशाखेच्या युनिट ४ ने राजस्थान येथून अटक केली असून त्याचे तीन साथीदार अद्यापही फरार आहेत. चौकशीत आरोपीने हुडकेश्वर परिसरातून एक मालवाहू वाहन चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. राहिल सुबदीन खान (२४, रा. ग्राम तुंडलका ता. पुनहना, जि. नुह हरियाना) असे राजस्थान येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने २७ एप्रिलला रात्री इंगोलेनगर हुडकेश्वर परिसरातील एसबीआयचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापुन १ लाख २६ हजार ९०० रुपये चोरी केले होते.
या प्रकरणी नरेश शामराव नवले (३९, रा. वाठोडा) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४६१, ३८०, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या अधिकारी, अंमलदारांनी आरोपी राहिलला राजस्थान येथून अटक केली. त्याने हा गुन्हा आपले साथीदार जाहुल खान (रा. ग्राम तुंडलका ता. पुनहना, जि. नुह हरीयाणा), फरीद खान, सौकत उर्फ सोंडा खान दोघे रा. सालहेडी, ता. जि. नुह, हरियाणा यांचे सोबत मिळुन केल्याचे ेसा ंगीतले. आरोपीने हुडकेश्वर ठाण्याच्या हद्दीतून २६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता चारचाकी मालवाहू वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीजवळून मोबाईल, कागदपत्र असा १० हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.