नागपूर - विविध शहरातील एटीएम हॅक करून त्यातून लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला. त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, जयपूरहून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे त्यांना घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांना आज ही माहिती दिली.
देशभरातील ठिकठिकाणच्या बँक अधिकाऱ्यांसाठी तसेच पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या या भामट्यांची नावे अनिस खान अब्दुल गफूर (वय २६) आणि मोहम्मद तालिब उमर मोहम्मद (वय २८) अशी आहेत. हे दोघेही हरियाणातील घिरनगी, पलवल येथील रहिवासी आहेत. अनिस हॉटेलमालक असून, तालिब सलून चालवितो. त्यांनी एक अनोखे तंत्र विकसित केले. त्याआधारे ठिकठिकाणच्या एटीएममधून ते लाखोंची रोकड काढून घेऊ लागले. १४ ते १६ जूनदरम्यान त्यांनी नागपुरातील एसबीआयच्या चार एटीएममधून ६ लाख, ७५ हजारांची रोकड काढून घेतली. बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी प्रतापनगर, गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक निर्माण केले. टेक्नोसेव्ही कर्मचाऱ्यांचा वापर करून उपायुक्त नुरूल हसन यांनी अत्यंत क्लिष्ट अशा या तपासाचे धागेदोरे जुळविले. आरोपी आयडीएफसी बँकेचे एटीएम वापरत असल्याचे आणि ते पलवल (हरियाणा)च्या एका व्यक्तीच्या नावे असल्याचे कळताच पोलिसांनी तपास पुढे सुरू केला आणि अखेर आरोपी अनिस खान तसेच मोहम्मद तालिबच्या राजस्थानमध्ये जाऊन मुसक्या बांधल्या. त्यांचा जयपूरच्या कोर्टातून ट्रान्झिट रिमांड मिळविण्यात आला असून, आरोपींना घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके तसेच उपायुक्त नुरूल हसन हजर होते.
---
अत्यंत प्रशंसनीय तपास
कार्डचा गैरवापर करून एटीएममधून रक्कम काढणे समजण्यासारखे आहे. मात्र, एटीएम मशीनच हॅक करणे आणि आपल्या स्वत:च्या खात्यात केवळ दहा हजार रुपये असताना त्या कार्डचा वापर करून लाखोंची रक्कम काढणे, हा प्रकार अनाकलनीय असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले. या दोघांनी देशातील अनेक ठिकाणी अशी बनवाबनवी केली. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांसोबतच पोलिसांसाठीही ते डोकेदुखी ठरले होते. अशांना हुडकून काढल्याबद्दल तपास पथकाला ५० हजारांचा कॅश रिवॉर्ड जाहीर करण्यात आल्याचेही आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.
---
---