‘बँकांचा संप, कामकाज ठप्प : सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभाग नागपूर : मालकधार्जिण्या कामगार कायद्यातील प्रस्तावित सुधारणा आणि बँकांतील कामकाजाच्या कंत्राटीकरणाला विरोध तसेच जनविरोधी बँकिंग सुधारणा धोरणांचा विरोध करीत युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) मंगळवारी एक दिवसीय संप पुकारला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकांचे कामकाज ठप्प झाले. मंगळवारी बहुतांश बँकांचे एटीएम कोरडे झाले होते. बँकांच्या एकदिवसीय संपाचा फटका एटीएमला बसला. बहुतांश एटीएमसमोर बंदचे फलक झळकत होते. एटीएमसमोरील गार्डने आज संप असल्यामुळे एटीएममध्ये पैसे नसल्याचे साांगितले. याचा मात्र सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला. रिझर्व्ह बँकेलगतच्या अलाहाबाद बँकेसमोर सर्व राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजता केंद्र शासनाच्या बँकांविरोधी धोरणाचा निषेध करीत आंदोलन आणि निदर्शने केली. यावेळी दोन हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी झाले. या संपात भारतीय मजदूर संघ या संघटनेशी संलग्न अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला नाही. यूएफबीयू ही बँकांच्या नऊ असोसिएशनची शिखर संघटना आहे. या शिखर संघटनेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात संप पुकारला होता. संपात १० लाखांपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. प्रारंभी बँक आॅफ इंडियाच्या किंग्जवे रोड येथील क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यावेळी जयवंत गुर्वे, मिलिंद वासनिक, चेंडिल अय्यर, योगेश गेडाम, अशोक अतकरे, सुरभी शर्मा, सत्यशील रेवतकर, प्रवीण ढोक, जे.डी. मौंदेकर, व्ही.के. मदान, संजय कुथे, सुमेध वासनिक, डी.वाय. छप्परघरे, संजय सहारके, आर.आर. सोनटक्के, संयुक्त संयोजक डॉ. प्रदीप येळणे, मनोहर अगस्ती आणि उपस्थितांनी नारेबाजी केली. त्यानंतर विशाल रॅली कस्तूरचंद पार्क, संविधान चौकमार्गे सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँकेसमोर पोहोचली. यावेळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. सर्व युनियनच्या नेत्यांसह डी.एस. मिश्रा, स्वयंप्रकाश तिवारी, बीईएफआयचे व्ही.व्ही. असई, ईएमबीईएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, महासचिव जयवंत गुर्वे, एआयबीओसीचे प्रबीर चक्रवर्ती, आयएनबीओसीचे नागेश दंदे, एसबीआयओएचे मुख्य क्षेत्रीय सचिव दिनेश मेश्राम आणि यूएफबीयूचे संयोजन अनंत कुळकर्णी यांनी सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विमुद्रीकरणादरम्यान मृत झालेल्या ग्राहकांना श्रद्धांजली वाहिली. सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख मागण्यांवर भर दिला. विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जादा कामाचा मोबादला, बँकांना कराव्या लागलेल्या खर्चाची भरपाई, कायद्यात बदल करून ग्रॅच्युईटी मर्यादेत वाढ, निवृत्तीसमयी मिळणारे आर्थिक लाभ पूर्णपणे आयकरमुक्त, सर्व बँका आणि वित्तीय संस्थातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची संचालकाच्या रिक्त जागी त्वरित नेमणूक, ११ व्या द्विपक्ष कराराच्या चर्चेस सुरुवात करून मुदतीनुसार करार अमलात यावा, पेन्शनशी निगडित सर्व प्रलंबित प्रश्न वाटाघाटीद्वारे सोडवावे, अनुकंपा आधारावर कर्मचारी भरती करावी, बँकांसाठी पाच दिवसाचा आठवडा लागू करावा, कर्ज बुडवणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
एटीएम’मध्ये ठणठणाट
By admin | Published: March 01, 2017 2:05 AM