आरोपींमध्ये मुन्ना यादव, साथीदारांसह तोतवानीचेही नाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता खरेदी-विक्रीच्या वादातून एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी महिनाभरानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आधी भाजपाचे स्थानिक नेते, बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव तसेच राजबीर यादव, गणेश यादव, प्रमोद डोंगरे आरोपी होते. आज पंजू तोतवानी यांचेही नाव या गुन्ह्यात वाढविण्यात आले आहे.
४० वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, ती ज्या घरात राहते, त्याचा तिने ताबा सोडावा म्हणून राजबीर यादव, प्रमोद डोंगरे आणि गणेश यादव सोबत वाद सुरू होता. मनासारखी रक्कम मिळत नसल्याने तो वाद चिघळला. २ जानेवारीला दुपारी पंजू तोतवानी यांच्या मध्यस्थीने मुन्ना यादवच्या अजनी चौकातील कार्यालयात याबाबत मीटिंग झाली. यावेळी राजबीर, प्रमोद आणि गणेश यादव होते. आरोपींनी तेथे तीन लाख रुपये घेऊन ताबा सोड, नाहीतर म्हणून महिलेचा पाणउतारा केला आणि धमकी दिली. त्यानंतर, १४ जानेवारीला सायंकाळी ही महिला एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे यांना भेटली. रात्री ठाण्यातून बाहेर निघताच राजबीर तसेच गणेश यादव आणि प्रमोद डोंगरे या तिघांनी अश्लील शिवीगाळ करून तिला धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी २ फेब्रुवारीला या प्रकरणात महिलेचा अपमान करून, तिला धमकावल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आता अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलम वाढविले आहे. सोबतच तोतवानीचेही आरोपी म्हणून या प्रकरणात नाव जोडले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रकरणाला वादग्रस्त पैलू
या प्रकरणात अनेक वादग्रस्त पैलू असून, गुन्हा दाखल झाल्यानंतरही सेटलमेंटसाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. परंतु दोन परस्परविरोधी गट या प्रकरणात स्वारस्य दाखवत पडद्यामागून हालचाली करीत आहेत. त्यातून ही घडामोड झाल्याची जोरदार चर्चा आहे.
----