भिवापूर : लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नाेंदविला आहे.
गुणवंता शांताराम जुगनाके (२६, रा. कोरंबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आरोपी गुणवंता गेल्या काही महिन्यापूर्वी पीडित मुलीच्या गावात ट्रॅक्टरचालक म्हणून रोजगारासाठी आला. यादरम्यान आराेपीने मुलीशी सलगी वाढवत तिला महागडा मोबाईल घेऊन दिला. लग्नाचे आमिष दाखवीत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर १४ ऑगस्टला त्याने तिला पळवून नेले. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. पाेलिसांनी आराेपीचे माेबाईल लाेकेशन तपासले असता, आराेपी हा नागपुरात असल्याचे दिसून आले. लागलीच भिवापूर पाेलिसांनी पथक रवाना करीत मंगळवारी (दि.१७) आराेपी व अल्पवयीन मुलीला उंबरगाव (ता. कुही) शिवारातून ताब्यात घेतले.
याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, पाेक्साे कलम ४ अन्वये गुन्हा नाेंदवून त्यास अटक केली आहे. पीडित मुलीला बालगृहात पाठविले असून, आराेपीला न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी दिली.