नागपूर : लोकांपुढे जातिवाचक शिविगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला.
अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांनी गोपीबाई कासदेकर यांच्या तक्रारीवरून ॲड. धर्मेंद्र सोनी यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविला होता. त्याविरुद्ध सोनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गोपीबाई १५ मार्च २०२० रोजी गॅस सिलिंडर व रेग्युलेटर घेण्यासाठी सोनी यांच्या भावाच्या एजन्सीमध्ये गेल्या होत्या. दरम्यान, सोनी यांनी एजन्सीच्या कॅबिनमध्ये गोपीबाई यांना जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप होता. उच्च न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये पडताळल्यानंतर हा गुन्हा लागू होत नसल्याचे सांगितले. ही घटना घडली त्यावेळी कॅबिनमध्ये गोपीबाई व सोनी यांच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. हा गुन्हा लागू होण्यासाठी संबंधित घटना लोकांपुढे घडणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद करून सोनी यांच्याविरुद्धचा वादग्रस्त गुन्हा रद्द केला.