नागपूर : दहशतवादी हल्ल्याच्या उद्देशाने नागपुरातील संवेदनशील स्थळांच्या रेकी प्रकरणात नागपूरची गुन्हे शाखा, एटीएस आणि एनआयए संयुक्तपणे तपास करीत आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक तपास पथक श्रीनगरला गेले होते. तेथे त्यांनी रेकी करणारा रईस अहमद याची चौकशी केली. हे पथक २७ डिसेंबर रोजी नागपूरला परत आले.
दरम्यान, रईस अहमद खाटी मोहल्ला, पांपोर, जि. अवंतीपूर येथील रहिवासी आहे. १२ वी नापास असलेला रईस इलेक्ट्रिशियन असून, त्याच्या घरची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. ते हेरून जैशचा कमांडर उमर याने राईसचे ब्रेन वाॅश केले. त्याच्यावर महालमधील संवेदनशील स्थळांच्या आजूबाजूचा परिसर बारकाईने पाहण्याची (रेकीची) जबाबदारी सोपविली होती. यामागे पुढच्या वेळी रईसकडूनच आत्मघाती हल्ला करून घेण्याचा जैशचा डाव असावा, असा अंदाज आहे.
कोणताही हल्ला उधळून लावू
बॉम्ब पेरणे, गोळीबार करणे, स्फोट घडवणे आणि आत्मघाती हल्ला करणे अशा कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला उधळण्याची आमची तयारी असून २४ तास नागपूर पोलीस सतर्क असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले.
फोर्स वन, एनएसजीची रिहर्सल
डिसेंबर २०२१ मध्ये नागपूर पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणांना रेकीचे इनपूट दिल्यानंतर फोर्स वन आणि एनएसजी कमांडो नागपुरात आले. हल्ला झाल्यास कसा परतवून लावायचा, त्याबाबत येथे रिहर्सल केली. ही दोन्ही पथके तब्बल सात दिवस नागपुरात मुक्कामी होती.
----