लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - धान्याचा काळाबाजार करणाऱ्याची गाडी पकडून कारवाईचा धाक दाखवीत लाखोंची तोडी केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चाैघांची पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली. दरम्यान,
लोकमतने मंगळवारी चाैघांच्या निलंबनाचे आणि खाबूगिरीचे वृत्त प्रकाशित केल्याने शहरभर खळबळ उडाली. लोकमतच्या वृत्ताचे डिजिटल कात्रण शहरातील पोलिसच नव्हे तर विविध व्हाॅट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाले. त्यानंतर या आणि अशाच प्रकरणात जुळलेल्या एका पोलिसानेच हे घडवून आणल्याची बाब आज शहर पोलीस दलात चर्चेला आली.
शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेशनच्या काळाबाजाराचा धंदा जोरात सुरू आहे. त्याला सुपारीचीही जोड आहे. काही पोलीस ठाण्यातील जुने खेळाडू धान्य आणि सुपारीवाल्यांची सेटिंग करून देत त्यांच्या गोरखधंद्याला संरक्षण मिळवून देतात. बदल्यात महिन्याला लाखोंची तोडपाणी करतात. मोठी देण देऊनही कारवाई झाली तर गोरखधंदा करणारा संतापतो. या प्रकरणात असेच झाले. धान्याच्या काळाबाजारात गुंतलेल्या मदानची गाडी पकडली. ८० हजार रुपये (रेकॉर्डवर) घेतले अन् नंतर मुलाला बेदम मारहाणही केली. त्यामुळे त्याने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली. आयुक्तांनी उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे चाैकशी सोपविली अन् त्यातून उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार पाल आणि शिपाई प्रसेनजित जांभूळकर या चाैघांचे निलंबन झाले.
---
पडद्यामागचा खेळाडू मुख्यालयात
लोकमतने या प्रकरणाची आणि चाैघांच्या निलंबनाचे वृत्त आज प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या आणि अशाच प्रकरणात गुंतलेला एक पोलीस कर्मचारी या घडामोडीमागे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पडद्यामागचा हा खेळाडू पोलीस मुख्यालयात कार्यरत असल्याचेही संबंधितांनी म्हटले आहे. त्यानेच तक्रार करण्यासाठी संबंधितांना दिशा दिल्याचीही चर्चा आहे.
---