वीज दरवाढीला विरोध : आत सुनावणी बाहेर निदर्शने नागपूर : महावितरणतर्फे सादर वीज दरवाढ याचिकेवर वनामती सभागृहात सुनावणी सुरू होती. दरम्यान, आत आणि बाहेरही या वीज दरवाढीचा निषेध करण्यात आला. प्रस्तावित वीज दरवाढ मागे घेणे आणि एसएनडीएल हटाव, या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. कॉँग्रेससोबतच प्रहार संघटना आणि विदर्भवादी विद्यार्थी संघटनांनी वनामतीबाहेर निदर्शने केली. वनामती सभागृह येथे बुधवारी प्रस्तावित वीज दरवाढीबाबत जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या दरवाढीेचा निषेध करीत नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता वनामतीवर धडक देण्यात आली. कार्यकर्ते वनामती परिसरात पोहोचताच वीज दरवाढ आणि एसएनडीएल हटावबाबत नारेबाजी करू लागले. पोलिसांनी त्यांना दरवाजावरच रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांची संख्या पाहता पोलिसांना यश आले नाही. कार्यकर्ते इमारतीच्या आत शिरलेच. दरम्यान पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तरीही कार्यकर्ते इमारतीत शिरलेच. या झटापटीत दरवाजावरील मेटल डिटेक्टर व झाडाची कुंडी खाली पडून तुटली. वरच्या माळ्यावर सुनावणी सुरू होती. कार्यकर्ते नारेबाजी करीत सुनावणीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. कार्यकर्त्यांच्या नारेबाजीमुळे थोडा वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नव्हते. अखेर शिष्टमंडळाने सुनावणीमध्ये आपले म्हणणे मांडावे, असे ठरले. शिष्टमंडळात किती सदस्य जातील, यावरूनही काही वेळ वाद झाला. अखेर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आयोगाला भेटले आणि आपले म्हणणे सादर केले. आंदोलनात प्रशांत धावडे, बंटी शेळके, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, हरीश ग्वालबंसी, अॅड. संदेश सिंगलकर आदींसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) एसएनडीएल हटवा एसएनडीएल कंपनीकडून वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. कंपनी कंत्राटी कामगारांकडून कामे करवून त्यांची पिळवणूकसुद्धा करीत आहे. तेव्हा एसएनडीएलचा एकूण कारभार पाहता ही फ्रेंचायसी रद्द करून याचा कारभार पुन्हा महावितरण कंपनीला देण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली. जनसुनावणी बोगस अडीच कोटी वीज ग्राहकांचा प्रश्न असतांना यासंबंधीची सुनावणी केवळ आठ ते दहा ठिकाणी होत आहे. केवळ एकच दिवस सुनावणी होत असल्याने सर्व मिळून केवळ दोन हजारावरच लोक आपले म्हणणे मांडू शकतात. त्यामुळे ही सुनावणीच बोगस असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे. प्रहारचे चंद्रपूर येतील जिल्हा अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वनात वीज दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. देशमुख यांनी सांगितले की, सुनावणी असल्याबाबत शासनाने मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्याची गरज आहे. सध्या व्हॉट्सअॅप व फेसबुकचा जमाना आहे. तेव्हा वीज ग्राहकांच्या तक्रारी फेसबुक व व्हॉट्सअॅपवरून सुद्धा स्वीकारण्यात याव्यात. चंद्रपुरात संपूर्ण विजेपैकी ३० टक्के वीज तयार केली जाते. या वीज प्रकल्पांमुळे येथील जनतेला प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे चंद्रपूर येथील नागरिकांना वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी. तसेच वीज कंपन्यांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. विदर्भवादी विद्यार्थी संघटना विदर्भवादी विद्यार्थी संघटनेच्यावतीने सुद्धा वनामती सभागृहाबाहेर वीज दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली. अध्यक्ष महेंद्र कापसे, संस्थापक प्रभाकर कोंडबत्तुनवार आणि सरचिटणीस सीमा नेवारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभगी होते.
कॉँग्रेसचा हल्लाबोल, ‘प्रहार’चा प्रहार
By admin | Published: July 14, 2016 3:05 AM