- लोकांनी गुन्हेगाराची केली धुलाई, कोरोडी ठाण्यात प्रकरणाची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हल्ला चढवून हप्ता मागणाऱ्या गुन्हेगाराची नागरिकांनी जोरदार धुलाई केली. कोराडी नाक्याजवळ घडलेल्या या घटनाक्रमात पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध प्रकरणाची नोंद केली आहे.
४५ वर्षीय बलराम डांगी कृष्णा निवास अपार्टमेंटमध्ये राहतो. याच अपार्टमेंटमध्ये दीपक अमित पुरी, दीपक कटियार राहतात. मंगळवारी रात्री १० वाजता अमित पुरी फ्लॅटमधील साहित्य दुसरीकडे नेत होते. त्याच वेळी बलराम डांगी तेथे आला. त्याने अमित पुरी यांना २० हजार रुपयाची मागणी केली. रुपये दिले नाही तर सामान दुसरीकडे नेऊ देणार नाही, अशी धमकी त्याने दिली. अमितने पैसे देण्यास नकार दिल्यावर डांगीने शिवीगाळ करीत बॅटने हल्ला चढवीत अमितला जखमी केले. अमितनेसुद्धा दीपक कटियार व पॉलच्या मदतीने डांगीची धुलाई केली आणि त्याला जखमी केले. दोन्ही गट तक्रार करण्यासाठी कोराडी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध प्रकरणाची नोंद करून डांगी व अमित यांना ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, डांगीने काही दिवसापासून परिसरातील नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. १४ एप्रिल रोजी त्याने कार पार्किंगच्या वादात कट्ट्यातून फायर करीत एका युवकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. ऐनवेळी युवकाचे नातेवाईक आणि अन्य नागरिक तेथे पोहोचल्याने अघटित घडले नाही. मानकापूर पोलिसांनी डांगीला अटकही केली होती. मात्र, काही दिवसात जामिनावर तो बाहेर आला. यामुळे तो आणखीन बेडरपणे वागायला लागला. काही काळापूर्वी डांगी हा मद्य तस्करीमध्येही लिप्त होता, असे सांगितले जाते. याच परिसरात त्याचा एक डिपार्टमेंट स्टोरही आहे. २० दिवसात दुसऱ्यांदा त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाल्याने पोलीस त्याचा जामीन रद्द करून त्याच्याविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.
.............