लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : सहा सशस्त्र दराेडेखाेरांनी हिंगणा येथील द अचिवर स्कूलवर हल्ला चढविला. यात शाळेच्या आवारात असलेला सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ३) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली असून, सर्व दराेडेखाेर चड्डी-बनियान टाेळीचे सदस्य असावेत, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून, सर्व दराेडेखाेर २५ ते ३० वर्षे वयाेगटातील असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
गजानन दहने (५२) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ते शनिवारी रात्री १२.४५ वाजेपर्यंत कर्तव्यावर हाेते. रात्र झाल्याने आराम करण्याच्या उद्देशाने ते शाळेच्या हाॅलमधील साेफ्यावर लेटले हाेते. दरम्यान, इमारतीच्या मागच्या खिडकीतून २५ ते ३० वर्षे वयाेगटातील सहा जण आत आले. त्यांनी गजानन दहने यांना घेरून धमकवायला सुरुवात केली. शाळेतील ५० हजार रुपये कुठे ठेवले आहेत, याबाबत विचारणा करू लागले. या रकमेबाबत आपल्याला माहिती असल्याचेही ते वारंवार सांगत हाेते.
यातील एकाने गजानन यांचा हात पकडून त्यांच्यावर चाकूने वार केले. दुसऱ्याने त्यांचा माेबाइल हिसकावून घेत जमिनीवर आपटला. त्यावर मी चाैकीदार असून, मला काही माहिती नाही, असे म्हणू गजानन विनवणी करू लागले. त्यातच काहींनी शाळेचे कार्यालय हुडकायला सुरुवात केली. त्यातच संधी मिळताच गजानन यांनी खिडकीतून उडी मारून बाहेर पळ काढला आणि परिसरातील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी लगेच शाळा गाठली. ताेपर्यंत सर्व जण तिथून पळून गेले हाेते. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
....
घरांवर दगडफेक
याच काळात दराेडेखाेरांनी शाळेच्या परिसरात राहणाऱ्या शेखर देऊळकर यांच्या घराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. याबाबत शेजाऱ्यांना जाग आली. त्यांनी काेण आहे, असा आवाज देताच दराेडेखाेरांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे भीतीपाेटी कुणीही घराबाहेर निघाले नाही. याच दराेडेखाेरांनी दीपक वासनिक यांच्या घरी चाेरी करण्याचा प्रयत्न केला.
...
सीसीटीव्ही फुटेज
माहिती मिळताच पाेलीस उपनिरीक्षक अहिरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी लगेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. दराेडेखाेरांनी मात्र मागच्या भागाने आत प्रवेश केला हाेता. सर्व जणांनी टी शर्ट व हाफ पॅन्ट परिधान केली हाेती. चेहऱ्यावर दुपट्टा बांधला हाेता. यातील तिघे काळ्या वर्णाचे हाेते. सर्व जण आपसात हिंदीत बाेलत हाेते. त्यामुळे ते चड्डी-बनियान टाेळीचे सदस्य असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.