लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला होस्टेलच्या रुममध्ये डांबून बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ बहुजन स्टुडंट फेडरेशन व बहुजन युवा आघाडीने गुरुवारी निदर्शने करीत हल्लाबोल केला.निदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन सादर केले. या निवेदनात ज्या संलग्नित महाविद्यालयामध्ये ही गंभीर घटना घडली त्या महाविद्यालयाची मान्यता काढण्यात यावी, तेथील सेमिस्टर पॅटर्न बंद करावे, या मुख्य मागणीसह कॉलेजनिहाय विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया एक महिन्यात पार पाडावी. निवडणुकीत आरक्षण, वयाची अट व एटीकेटीची अट नसावी, सर्वांना मतदान व निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असावा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी असावी, निवडणूक अधिकारी हा विद्यापीठाचा असावा, मान्यताप्राप्त महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य व शिक्षकांची नियुक्ती करावी, शिक्षकांचे वेतन विद्यापीठाच्या बँक खात्यातून देण्यात यावे, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.आंदोलनात संघटनेचे इंजि नितेशकुमार, सुशील ढोलेकर, शुभम कांबळे, नितीन ताकसांडे, अॅड. मिलिंद मेश्राम, राजरत्न वानखेडे, आकाश नळे, अमित वंजारी, अभिनील मेश्राम, कार्तिक भोयर यांचा समावेश होता.