नागपूर : जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार येत्या १४ एप्रिल रोजी नागपूरला येणार आहे. यावरून कन्हैयाला विरोध करणाऱ्या संघटना सक्रिय झाल्या आहेत. बजरंग दलाने कन्हैयाला नागपुरात येऊ देणार नाही व आल्यास त्याच्यावर हल्ला करून त्याला धडा शिक वू, अशी धमकी बजरंग दलाने दिली आहे.जेएनयूमधील घटनेमुळे चर्चेत आलेला कन्हैया कुमार १४ एप्रिल रोजी नागपूरला येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर जाणार आहे. त्यानंतर शहरातील काही कार्यक्रमातही तो सहभागी होईल, अशी माहिती आहे. दरम्यान, बजरंग दलाचे नागपूर महानगर संयोजक राजकुमार शर्मा यांनी रविवारी पत्रपरिषदेत कन्हैयाला नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला. तो नागपुरात पोहोचल्यास दीक्षाभूमी वगळता इतर ठिकाणचे त्याचे कार्यक्रम हाणून पाडू आणि बजरंग दल स्टाईलने मिळेल तेथे हल्ला करून त्याला धडा शिकवू, अशी धमकी शर्मा यांनी यावेळी दिली. कन्हैयावर देशद्रोही असण्याचा ठपका ठेवत, त्याला नागपुरात येऊ देऊ नये, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. बजरंग दलाचे ८०० कार्यकर्ते तयारीत राहणार असल्याचे सांगत कन्हैयाच्या येण्याने शहरातील वातावरण बिघडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांची राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेला विशाल पुंज, नीलेश टेकाडे, राजेश शुक्ला, नवीन गोल्हर, विक्की पांडे, मंगेश बडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कन्हैया कुमारवर हल्ला करू
By admin | Published: April 12, 2016 5:31 AM