लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या दहशतीचा फायदा घेत काही औषध विक्रेते ‘एन-९५’ मास्कचा काळाबाजार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने सामारे आणताच खळबळ उडाली. स्वत: जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर धाडी टाका, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिले. ‘एफडीए’ने दिवसभरात काही औषध विक्रेत्यांची तपासणी केली, सोबतच औषध विक्रेता असोसिएशनच्या पदाधिकाºयांची बैठक घेऊन मास्क तुटवड्याची माहिती घेतली.देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या वाढत असताना लोकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एन- ९५’ मास्कचा तुटवडा पडला आहे. याचा फायदा काही कंपन्या व औषध विक्रेत्यांनी घेणे सुरू केल्याने मास्कचा काळाबाजार सुरू झाला आहे. स्टॅण्डर्ड कंपनीच्या मास्कची किंमत १५० रुपयांना असताना, सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळल्या जाणाऱ्या मास्कला ‘एन-९५’ नाव देऊन २५० रुपयांत त्याची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे हा मास्क पॅकबंद नाही. त्यावर कंपनीचे नाव नाही. ‘एमआरपी’ही नाही. याचे वास्तव ‘लोकमत’ने ६ मार्चच्या अंकात ‘एन-९५ मास्कचा काळाबाजार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी माताकचेरी येथील आरोग्य सेवा कार्यालयात कोरोना विषाणूवर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मास्कचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर धाडी टाकण्याचे आणि प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश दिले. या पत्रपरिषदेला औषध प्रशासनाचे सहआयुक्त पी.एन. शेंडे उपस्थित होते. त्यांनी ‘लोकमत’च्या माहितीवरून संबंधित औषध विक्रेत्याची चौकशी केली.
मास्क विक्रीवर कारवाईचे अधिकार नाहीतऔषध प्रशासनाचे सहआयुक्त शेंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मास्क औषध प्रवर्गात मोडत नाही. यामुळे त्यांच्या विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. परंतु आमच्या तपासणीत संबंधित औषध विक्रेत्याची चौकशी केली असता संबंधित मास्कवर किमत, कंपनीचे नाव व बॅचनंबर आढळून आलेले नाही. ही एक गंभीर बाब आहे. याची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.
प्रिस्क्रिप्शनशिवाय मास्कची विक्री नाहीशेंडे म्हणाले, औषध विक्रीच्या दुकानातून मोठ्या प्रमाणात मास्कची विक्री होते. यामुळे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन् शिवाय मास्कची विक्री करू नका, अशा सूचना केल्या आहेत. विना प्रिस्क्रिप्शन मास्क विकताना आढळल्यास आम्ही कारवाई करू.