कामठी : दुचाकी वाहने चाेरीचे प्रमाण वाढत असतानाच कामठी (नवीन) पाेलिसांनी अट्टल वाहनचाेर असलेल्या दाेघांना अटक केली. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीची माेटरसायकल जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२) रात्री ७ वाजताच्या सुमारास कामठी-कळमना मार्गावर करण्यात आली.
राजकुमार धरमपाल शाहू (२०) व अनेश कल्लू शाहू (२२) दोघेही रा. कळमना वस्ती, नागपूर अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. मोहम्मद अश्फाक मोहम्मद आसिफ, रा. विणकार काॅलनी, कामठी यांची एमएच-४०/बीबी-६५९९ क्रमांकाची माेटरसायकल त्यांच्या घरासमाेरून चाेरीला गेली हाेती. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना याच क्रमांकाची माेटरसायकल कामठी-कळमना मार्गावर दिसली. संशय असल्याने त्यांनी दुचाकीचालकास थांबण्याची सूचना केली; मात्र त्याने दुचाकीचा वेग वाढवून पळ काढला.
पाेलिसांनी पाठलाग करून त्यात अडविले व दुचाकीवरील दाेघांनाही ताब्यात घेत चाैकशी केली. दाेघेही अट्टल वाहनचाेर असल्याचे तसेच त्यांनी ती माेटरसायकल चाेरून नेल्याचे कबूल केल्याने दाेघांनाही अटक करण्यात आली. शिवाय, त्यांच्याकडून माेटरसायकल जप्त केली. त्या माेटरसायकलची किंमत २५ हजार रुपये असल्याचे तसेच त्यांच्याकडून वाहनचाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता असल्याचे ठाणेदार संजय मेंढे यांनी सांगितले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.