लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामाची गती समाधानकारक नाही. तरीही ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) ला ७८.६४ कोटी रुपयाचे अतिरिक्त काम देण्याची तयारी नागपूर एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल) ने केली आहे. परंतु संबंधित प्रकरण लोकमतने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणताच मनपा प्रशासनासोबतच ओसीडब्ल्यू व एनईएसएलच्या निदेशकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरण दडपण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत. कराराशी संबंधित दस्तावेज तपासून पाहिले जात आहे. जेणेकरून त्याचा हवाला देऊन काेट्यवधीची कामे टेंडर न काढताच संबंधित कंपनीला देता येईल.
लोकमतकडे उपलब्ध असलेल्या दस्तावेजानुसार २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या एनईएसएलच्या बोर्ड मिटिंगमध्ये कोट्यवधींचे अतिरिक्त काम देण्याच्या निर्णय निदेशकांच्या उपस्थितीत झाला. महापौर संदीप जोशी एनईएसएलचे चेअरमन आहेत. सोबतच सत्तापक्ष नेते, विराेधी पक्ष नेते, स्थायी समितीचे अध्यक्ष हे निदेशक म्हणून कार्यरत आहेत. नागरिकांनी यांना निवड़ून दिले आहे. यांच्या उपस्थितीत नियमांना डावलून काम वितरित होत असेल तर निश्चितच लोक त्यांना प्रश्न विचारतील. पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, एनईएसएल बोर्ड ऑफ डायरेक्टर (बीओडी) च्या बैठकीत जारी निर्देशाच्या आधारावर ओसीडब्ल्यूला सांगायचे आहे की, ते कोट्यवधीचे काम करण्यासाठी सक्षम आहे का? एनईएसएलच्या कार्यकारी निदेशक व मनपाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्या स्वाक्षरीने ओसीडब्ल्यूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र जारी करण्यात आले आहे. त्याच दिवशी बीओडीच्या मिटिंगनंतर लगेच पत्र जारी करून ओसीडब्ल्यूला सल्ला मागण्यात आला.
सूत्रानुसार आगामी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत संबंधित प्रस्तावास मंजुरी देण्याची तयारी करण्यात आली आहे. परंतु वृत्त प्रकाशित झाल्याने भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. त्यामुळे काही दिवसासाठी संबंधित बैठक टाळली जाऊ शकते. असेही होऊ शकते की, काही दिवसांसाठी हा प्रस्ताव होल्डवर ठेवला जाईल.
कंपनीच्या बीओडीत बदलाच्या प्रस्तावावर मागितला कायदेशीर सल्ला
मे. आरेंज सिटी वॉटर प्रा. लिमिटेड (ओसीडब्ल्यू)च्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये बदलाची माहिती बोर्ड ऑफ डायरेक्टरला (बीओडी)देण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात बीओडीने कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश दिले आहे. ओसीडब्ल्यूमध्ये ५० टक्के शेअर विवेलिया कंपनी आणि ५० टक्के विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांचे आहेत. दोघांनी ओसीडब्ल्यू कंपनी स्थापन करून मनपाशी करार केला आहे. शेअरवरून झालेल्या वादानंतर ओसीडब्ल्यूच्या काही निदेशकांनी आपले हात मागे घेतले. परंतु आतापर्यंत त्यांचे नाव समोर आलेले नाही.
विना टेंडर काम देणार नाही
ओसीडब्ल्यूला टेंडर न काढता एकही काम देण्यात येणार नाही. कुठलेही काम देण्यात आलेले नाही. मनपा नियमानुसारच काम देईल. नियमाच्या बाहेर जाऊन काम देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ देणार नाही.
विजय झलके, स्थायी समिती अध्यक्ष व एनईएसएलचे निदेशक