लाखोंची रोकड वाचली - रात्री गार्ड नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
सीताबर्डीतील झांशी राणी चौकात असलेले एटीएम फोडून त्यातील रोकड चोरण्याचा एका चोरट्याने प्रयत्न केला; मात्र बरेच प्रयत्न करूनही त्याला कॅश बॉक्स फोडण्यात यश आले नाही. त्यामुळे लाखोंची रोकड वाचली. सोमवारी ही घटना उघडकीस आली.
झाशी राणी चौकातील सांस्कृतिक संकुलात आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. रविवारी रात्री या संकुलात एक भामटा शिरला. समोरच्या पायरीवर तब्बल तासभर तो पडून राहिला. झोपण्याचे सोंग करून त्याने संकुलात आणि एटीएमच्या आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास तो एटीएममध्ये शिरला. त्याने एटीएमचे फ्रंट लॉक तोडून आतमधील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला; मात्र कॅश बॉक्स फोडण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे आतमधील लाखोंची रोकड वाचली. १०.३० ते ११.५९ असे
तब्बल दीड तास त्याने प्रयत्न केले आणि अखेर तेथून तो पळून गेला. सोमवारी दुपारी ही बाब लक्षात आल्यानंतर बाजूच्यांनी बँक अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर बँकेतर्फे नीलेश जगन्नाथ जाधव (वय ४२, रा. फुटाळा) यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एटीएमचा सीसीटीव्ही तसेच बाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. चोरट्याने एटीएमच्या सीसी टीव्हीवर ग्रीससारखा चिकट पदार्थ लावला. त्यामुळे व्यवस्थित चित्र दिसत नाही. चोरीची एकूणच पद्धत बघता तो सराईत चोरटा असावा, असा संशय आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
---
रात्रीला चौकीदार नाही
या संकुलात अनेक शोरूम आणि वेगवेगळे ऑफिसेस आहेत; मात्र रात्रीच्या वेळी तेथे एकही चौकीदार नसतो, असे या घटनेच्या निमित्ताने उघड झाले आहे.
----