लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - नरेंद्रनगरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये शिरून दोन चोरट्यांनी दगडाने एटीएम फोडून कॅश काढण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री १२. १९ ते १२. ३९ च्या दरम्यान ही घटना घडली.
बेलतरोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री दोन भामटे एटीएममध्ये शिरले. त्यांनी मशीनमधील कॅश बॉक्स फोडण्यासाठी दगड आणि पेचकसचा वापर केला. २० मिनिटे प्रयत्न करूनही त्यात त्यांना यश आले नाही. तेवढ्यात एक वाहन एटीएमसमोरून गेले. पोलिसांचे वाहन असावे, असे समजून चोरट्यांनी तेथून पळ काढला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक अधिकारी स्नेहल आत्माराम अन्नछत्रे (वय ३५) यांनी बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एटीएम तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. एटीएमच्या सीसीटीव्हीत चोरीच्या प्रयत्नाची घटना कैद झाली आहे. त्यावरून पोलीस चोरट्यांचा छडा लावण्याचे प्रयत्न करीत आहेत.
----