लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधीची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळक्याविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. वामन कोहाड, पंकज कोहाड (रा. वैशालीनगर, पाचपावली) चित्तरंजन गोसेवाडे (महाल) आणि राजू सांडोल अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मनोहर चंद्रभान राऊत (वय ४०) हे प्रताप नगरातील विद्या विहार कॉलनी राहतात. त्यांची बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंडस्ट्रिअल विकल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. राऊत यांच्या मालकीची मौजा बेसा येथे दोन एकर जमीन आहे. ही जमीन २०१० मध्ये ८० लाखात विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे उपरोक्त चौकडीने तयार केली. ११ फेब्रुवारीला तेथे आपला मालकी हक्क दर्शविणारा फलक आरोपींनी तेथे लावला. ही जमीन दुसऱ्यांना कोट्यवधी रुपयात विकण्याचे प्रयत्नही सुरू केले. त्याची कुणकूण लागल्यामुळे काही दिवसांपूर्वी राऊत आपल्या शेताकडे गेले. त्यांना तिथे उपरोक्त आरोपींच्या मालकीचा फलक दिसला. त्यामुळे त्यांनी बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेतली. ठाणेदार विजय आकोत यांनी प्रकरणाची कागदपत्रे तपासली. किमान चार ते पाच कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन हडपण्यासाठी आरोपींनी कट-कारस्थान केल्याचे आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचे ठाणेदार आकोत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राऊत यांची तक्रार नोंदवून घेतली. रविवारी याप्रकरणी आरोपी वामन कोहाड, पंकज कोहाड, चित्तरंजन गोसेवाडे तसेच राजू सांडोल या चौघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
अनेक टोळ्या सक्रिय
हुडकेश्वर, सोनेगाव, बेसा, बेलतरोडी भागात जमिनींना सोन्याचा भाव आलेला आहे. अनेक जण कित्येक महिने आपल्या भूखंड किंवा जमिनीकडे जाऊन बघत नाहीत. अशा बेवारस दिसलेल्या जमिनीची कागदपत्रे तयार करून ती परस्पर विकून टाकणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या या भागात अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. हुडकेश्वर, सोनेगाव आणि बेलतरोडी परिसरात या टोळीने धुमाकूळ घातला आहे. अनेकदा विविध पोलीस ठाण्यात या टोळ्यांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. या प्रकरणातून पुन्हा या टोळीचा प्रताप उजेडात आला आहे.