लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदनिकेचे जबरदस्तीने कुलूप तोडून त्यावर कब्जा करणाऱ्या तिघांनी नंतर सदनिका मालकाला मारहाण करून ८० लाखांची खंडणी मागितली. ४ एप्रिलला घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तब्बल पाच महिन्यानंतर, शुक्रवारी गुन्हा दाखल केला. रामदासपेठमधील रहिवासी पंकज प्रफुलकुमार भन्साली (वय ४८) यांची अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगरमध्ये सुकरांत अपार्टमेंटमध्ये ३०१ क्रमांकाची सदनिका आहे. आरोपी लालचंद वीरभान मोटवानी (वय ३२, रा. मॅजेस्टिक हाईट अपार्टमेंट), समीर शर्मा (वय ३५, कमल बिअरबारजवळ इंदोरा चौक) आणि राकेश रंजन (वय ३५, रा. साहिल ऑप्टिकल, रुफ नाईन धरमपेठ) या तिघांनी ४ एप्रिलला सकाळी ११ च्या सुमारास सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी भन्साली तेथे पोहोचले. त्यांनी विचारणा केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून ही सदनिका आमची आहे, असे सांगितले. तुम्हाला खाली करून पाहिजे असेल तर ८० लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणून आरोपींनी भन्साली यांना गालावर आणि पाठीवर मारहाण केली. येथून निघून जा, नाहीतर तुझे अपहरण करून जिवे ठार मारू, अशी धमकीही दिली. याप्रकरणी भन्साली यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी मोटवानी, शर्मा आणि रंजन या तिघांविरुद्ध सदनिकेवर कब्जा करून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नाही. तपास सुरू आहे, असे अंबाझरी पोलिसांनी सांगितले.
सदनिका बळकावण्याचा प्रयत्न, मागितली ८० लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:29 AM