लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फर्ममध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला मिठीत घेण्याचा प्रयत्न करणारा कॉटन ब्रोकर मनीष अग्रवाल (वय ४५) विरुद्ध लकडगंज पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
तक्रार करणारी सोनू (काल्पनिक नाव) १९ वर्षांची आहे. ती लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीष अग्रवालच्या महालक्ष्मी कॉटन ब्रोकर नामक फर्ममध्ये अकाऊंटंटचे काम करीत होती. तिने सोमवारी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता ती ऑफिसमध्ये पोहचली. अग्रवाल यावेळी आला आणि त्याने गुड मॉर्निंग म्हणत सोनूच्या गालाला हात लावला. मालक म्हणून तिने कानाडोळा केल्याचे बघून त्यानंतर मनीष अग्रवाल नेहमीच तिच्या हाताला, खांद्याला स्शर्श करायचा. ती उभी असल्याचे पाहून पार्श्वभागावर हात लावायचा. १ नोव्हेंबरला सुटी असूनदेखिल त्याने सोनूला कार्यालयात बोलविले. ‘तुझा बॉयफ्रेण्ड आहे का, अशी विचारणा केली.नाही म्हटले असता, मला बनवून घेे’, असे म्हणाला. त्यानंतर त्याने तिला घट्ट मिठीत पकडण्याचा प्रयत्न केला. सोनूने त्याला धक्का देऊन बाजूला केले आणि तडक घराकडे निघाली. यावेळी आरोपी कारने तिच्या मागून आला आणि तिला कारमध्ये बस घरी सोडून देतो, असे म्हणाला. सोनूने त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतचे घर गाठले. आपल्या वहिनीला ही घटना सांगितली. त्यानंतर घरच्यांनी धीर दिल्यामुळे सोमवारी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अग्रवालविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
विच्छा माझी पुरी कर ।
पोलिसांकडे सोनूने नोंदविलेल्या तक्रारीनुसार अग्रवालने तिला ‘विच्छा माझी पुरी कर, तुला बर्थ डे गिफ्ट म्हणून दुचाकी घेऊन देईल’, असा प्रस्ताव दिला होता, असे समजते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी अग्रवालला अटक केली. त्याला आज न्यायालयातून जामिन मिळाल्याचे लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी सांगितले.