ठळक मुद्देगळ्यात फास टाकून आवळलाआई अत्यवस्थ, मुलगी धोक्याबाहेरआरोपीची जमावाकडून धुलाई,अटक
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायलेकींना मारहाण केल्यानंतर त्यांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांची हत्या करण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. मुलीने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला मात्र तिच्या आईची प्रकृती गंभीर आहे. आरोपीला संतप्त जमावाने घटनास्थळीच पकडून बेदम चोप दिला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी २ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.यादवनगराच्या जयभीम चौकाजवळ प्रमिला श्रीचंद विश्वकर्मा (वय ५९) यांचे निवासस्थान आहे. त्या, मुलगी कविता (वय अंदाजे ३५) आणि मुलगा अजय विश्वकर्मा तेथे राहतात. प्रमिला यांची बहीण जरीपटक्यात राहते. तिचा मुलगा आरोपी अविनाश मालवीय याला प्रमिला यांनी काही महिन्यांपूर्वी ४ लाख रुपये उधार दिले होते. ते परत मिळावे म्हणून प्रमिला यांनी अविनाशच्या मागे तगादा लावला होता. तो रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. प्रमिलाने काही दिवसांपूर्वी त्याला चांगलेच खडसावले. त्यावेळी त्याने शनिवारी ७ जुलैला रक्कम परत देतो,असे सांगितले. त्यानुसार, शनिवारी दुपारी २ च्या सुमारास तो मावशी प्रमिला यांच्या घरी आला. यावेळी त्या घरात एकट्याच होत्या. त्याला पहाताच प्रमिला यांनी पैशाची मागणी केली. त्याने टेरेसवर चल हिशेब करू असे म्हणत प्रमिलांना घराच्या टेरेसवर नेले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यात केबलच्या वायरचा फास टाकून करकचून आवळला. बेशुद्ध पडल्यामुळे प्रमिला ठार झाल्या असे समजून आरोपी खाली आला. त्यावेळी त्याला कविता घरात दिसली. तुझी आई बेशुद्ध पडली आहे, पाणी घे असे म्हणत त्याने तिलाही वर नेले. तेथे कविताला मारहाण करून आरोपीने तिच्या गळ्यात फास टाकून आवळला. प्रमिलाने जोरदार प्रतिकार करून त्याच्या पोटात लाथ मारली आणि फास काढून टेरेसवरून शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज देत खाली पळ काढला. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपी अविनाशला पकडून त्याची बेदम धुलाई केली.गंभीर अवस्थेत प्रमिला आणि कविताला खासगी रुग्णालयात दाखल केले. वृत्तलिहिस्तोवर यशोधरानगर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी गुड्डू उर्फ अविनाश घनश्याम मालवीय हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जरीपटका आणि कोराडी ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समजते. मावशीच्या हत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्याने ‘तुम्ही घर विकणार आहात. माझ्याकडे ग्राहक असून मला घर दाखवा, असे म्हणत घराच्या टेरेसवर नेल्याचे पोलीस सांगतात. मायलेकीच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने यादवनगरात खळबळ उडाली आहे. पाच महिन्यांपूर्वी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्याच्या वादातूनच गणेश शाहू नामक आरोपीने उषा कांबळे या महिलेला घराच्या पहिल्या माळळ्यावर नेऊन त्यांची तसेच त्यांच्या चिमुकल्या नातीची निर्घृण हत्या केली होती. यशोधरानगरातील आजच्या घटनेने कांबळे दुहेरी हत्याकांडाच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेला आल्या आहेत.