लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या एका नातेवाईकाविरुद्ध जादूटोणा करून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सचिन कनोजिया असे फिर्यादीचे नाव आहे. सचिनची पत्नी आणि दिलीप नावाचा एक व्यक्ती आरोपी आहे. सचिन आणि त्याच्या पत्नीचा न्यायालयात खटला सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून सचिनला त्याच्या घराजवळ लिंबू फेकले जात असल्याचे आढळून आले. कुणीतरी आपल्याला अघोरी विद्येने मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्याला संशय आला. त्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. शुक्रवारी सायंकाळी सचिनला कॅमेऱ्यात एक व्यक्ती घराजवळ संशयास्पद अवस्थेत दिसून आली. त्याला पकडल्यानंतर ती व्यक्ती त्याच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे त्याच्या फोनवरून दिसून आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.