लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जमिनीवर अवैध कब्जा करून वाद निर्माण करायचा आणि त्यानंतर जमीन मालकांकडून रक्कम उकळायची, अशी पद्धत असलेल्या भांगे टोळीने परसोडीतील कोट्यवधींची जमीन हडपण्याचे प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. जमीनमालक संजय गुलाबचंद गुप्ता यांनी कायदेशीर लढाई लढून अखेर भांगे टोळीची बनवाबनवी उघड पाडली. परिणामी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.संजय गुप्ता यांनी मौजा परसोडीतील खसरा क्रमांक ७२, ७३, ७४ / १ आणि ७६ / १ तसेच मौजा भामटी येथील खसरा क्रमांक २०, २१, २२ मधील जमीन १६ डिसेंबर २०१५ ला खरेदी केली होती. आज घडीला या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये आहे. गुप्ता वेळ मिळाला तेव्हा या जमिनीकडे फेरफटका मारतात. डिसेंबर २०१८ मध्ये ते अशाच प्रकारे जमिनीकडे गेले असता त्यांना त्यांच्या जमिनीवर लग्नाचा मंडप दिसला. आतमध्ये पाहणी केली असता तेथे त्यांना भांगे गार्डन अॅन्ड लॉन असा फलकही दिसला. ते हा सर्व प्रकार बघत असतानाच तेथे विनय पुरुषोत्तम भांगे आणि विनोद भांगे (रा. भांगे विहार जयताळा) तेथे आले. गुप्ता यांनी त्यांना ही जमीन आपली आहे, येथे तुम्ही येथे मंडप घालून बोर्ड कसा काय लावला, अशी विचारणा केली. या जमिनीचे विक्रीपत्र आपल्या पत्नीच्या नावे आहेत, असेही सांगितले. त्यावर भांगे यांनी ही जमीन आपली आहे, आपला येथे कब्जा आहे, असे म्हटले. त्यावर गुप्ता यांनी भांगेला जमिनीची कागदपत्रे मागितली असता ती देण्यास नकार देऊन आरोपींनी त्यांना येथे आपला कब्जा आहे, यापुढे येथे फिरकल्यास चांगले परिणाम होणार नाही, अशी धमकी देऊन गुप्तांना तेथून हाकलून लावले. आपल्याच जमिनीवर आपल्यालाच येण्यास भांगे मज्जाव करीत असल्याचे पाहून आणि भांगेची गुंडगिरी ऐकून दहशतीत आलेल्या गुप्तांनी २८ डिसेंबरला गुन्हे शाखेत तक्रार दिली.अखेर गुन्हा दाखल२२ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी ४ वाजता संजय गुप्ता त्यांच्या जमिनीवर गेले असता तेथे पुन्हा आरोपी विनय भांगे, विनोद भांगे, श्यामराव भांगे आणि त्याचा मुलगा तसेच त्यांचे चार साथीदार तेथे आले आणि त्यांनी गुप्तांना शिवीगाळ आणि धाकदपट करून हाकलून लावले. गुप्ता यांनी परत प्रतापनगर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी यावेळी गुप्ता आणि भांगे दोघांनाही त्यांची मालकी दाखविणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार गुप्ता यांनी आपल्या जमिनीची कागदपत्रे दाखवली. भांगे मात्र काहीच दाखवू शकले नाही. ते बनवाबनवी करून गुंडगिरी करीत आहेत तसेच त्यांनी गुप्ता यांच्या कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा मारला असल्याचे लक्षात आल्याने अखेर प्रतापनगर पोलिसांनी विनय भांगे, विनोद भांगे, श्यामराव भांगे तसेच त्याच्या मुलावर फसवणुकीचा आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक झाली की नाही, ते प्रतापनगर पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.