लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांना तातडीने दिलासा देण्यासाठी भरोसा सेल अधिक सक्षम आणि गतिमान करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिले. पोलीस मुख्यालयातील अलंकार सभागृहात महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.
काैटुंबिक वादाचा समेट व्हावा आणि महिलांना तातडीने न्याय देता यावा या दुहेरी उद्देशाने शहरात भरोसा सेल निर्माण करण्यात आला आहे. मात्र, अलीकडे भरोसा सेलमध्ये गेल्यानंतर तातडीने न्याय मिळत नाही. केवळ तारखेवर तारीख देऊन तासनतास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे या सेलवरचा भरोसा कमी होत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात आल्याने पोलीस आयुक्तांनी सोमवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले होते. त्यासाठी पीडित महिलांकडून अर्ज मागवून घेण्यात आले होते. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत ७५ महिलांना आज बोलावून घेण्यात आले. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांनी तातडीने निपटारा करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. महिलांच्या तक्रारीकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला. कोणत्याही महिलेची तक्रार प्रलंबित ठेवू नका, तिला तातडीने दिलासा देण्याचा प्रयत्न करा, असे आदेश देतानाच अमितेशकुमार यांनी यापुढे भरोसा सेल अधिक सक्षम आणि गतिमान करण्यात येईल, असे पत्रकारांना सांगितले. या वेळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि भरोसा सेलचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
----
दारुडा नवरा, सासूचा त्रास
तक्रार निवारण शिबिरात १४५ महिलांनी तक्रार अर्ज दिले होते. बहुतांश महिलांच्या तक्रारी दारूडा नवरा आणि सासूच्या विरोधात होत्या. शेजाऱ्यासोबत असलेल्या वादाच्या किरकोळ तक्रारीचाही त्यात समावेश होता.
----