लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारूचे बिल मागितले म्हणून संतप्त झालेल्या फुकट्या गुंडांनी बारमध्ये मोठी तोडफोड केली. एवढेच नव्हे तर टेबल-खुर्चीवर पेट्रोल टाकून बार पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारमध्ये शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली.
रविनगर चाैकात उडिपी बार ॲन्ड रेस्टॉरंट आहे. आरोपी असलम कलाम शेख (वय ३१) आणि रहिम शेख (वय ३२) हे दोघे तेथे नेहमी दारू प्यायला येतात. बिल मागितल्यास वाद घालतात. दोघेही गुन्हेगार असल्याने वाद नको म्हणून बारमालक त्यांच्याकडे कानाडोळा करीत होते. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली.
शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आरोपी असलम आणि रहिम शेख बारमध्ये आले. अर्धा तास यथेच्छ दारू पिल्यानंतर वेटरने बिल मागितले असता, त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. बारमधील खुर्च्यांची फेकाफेक केली. काऊंटरवर असलेले सीपीयू, मॉनिटर खाली आदळून फोडले आणि बीअरच्या बॉक्सचीही तोडफोड केली. आरोपी असलमने त्याच्या खिशात असलेली बाटली काढून त्यातील पेट्रोल बारमधील टेबल-खुर्चीवर टाकले आणि आग लावून दिली. प्रसंगावधान राखत बारच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच पाणी ओतून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे बारमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. संतप्त कर्मचाऱ्यांनी आरोपींना पकडून त्यांची बेदम धुलाई केली. हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पीएसआय संदीप शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. बार संचालक अनिल वसंतकुमार बेथरिया (वय ६१, रा. रविनगर) यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी असलम आणि रहिम शेखविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.