लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज ग्राहकाचे मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंता आणि महिला जनमित्रास शिवीगाळ करून, घरात कोंडाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीज ग्राहकाच्या विरोधात जलालखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबाडा गावातील वीज ग्राहक घनश्याम मोहनलाल कलंत्री यांच्या घरचे वीज मीटर तपासणी करण्यासाठी महावितरणच्या थडीपवनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता प्रज्ञाशील हरिदास डोंगरे, महिला जनमित्र रमाबाई काशीराम आगाशे व गजानन ठोंबरे गेले होते. आपले वीज मीटर योग्य स्थितीत असून त्याच्या तपासणीची काही गरज नाही, असे वीज ग्राहक कलंत्री यांचे म्हणणे होते. तुम्हाला वीज मीटर तपासणीचा अधिकार कुणी दिला असा मुद्दा समोर करून त्यांनी महावितरण कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. पण समाधान न झाल्याने त्यांनी शिवीगाळ सुरू करून कनिष्ठ अभियंता डोंगरे यांना धक्काबुक्की केली. सोबत असलेल्या जनमित्राना घरात कोंडण्याचा प्रयत्न केला. वादविवाद वाढल्याने शेजारील उपस्थित लोक मदतीला धावून आले. अखेर थडीपवनी शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता प्रज्ञाशील डोंगरे, महिला जनमित्र रमाबाई काशीराम आगाशे व गजानन ठोंबरे यांनी जलालखेडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी वीज ग्राहक घनश्याम मोहनलाल कलंत्री यांच्याविरोधात भादंंवि कलम ३५३,१८६, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
महावितरणच्या अधिकाऱ्यास कोंडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 8:44 PM