नागपूर : निर्जन ठिकाणी सोबत जाण्यास नकार दिल्यामुळे अल्पवयीन प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सोमवारी दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. शरद त्रिवेदी यांनी हा निर्णय दिला.
बलदेवसिंग लखनसिंग पंदराम (३०) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील मुळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो घोराड, ता. कळमेश्वर येथे राहत होता. त्याला प्रेयसीचा विनयभंग केल्यामुळे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. घटनेच्या वेळी पीडित प्रेयसी १६ वर्षे वयाची होती. आरोपी तिला लग्न करण्यासाठी आग्रह करीत होता. १४ मार्च २०२० रोजी रात्री ९.३० च्या सुमारास प्रेयसी शेतामधील विहीरीजवळ हात धुवत होती. दरम्यान, आरोपी मागून आला व तिला निर्जन ठिकाणी सोबत चलण्यास सांगितले. प्रेयसीने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने ठार मारण्याच्या उद्देशाने प्रेयसीला उचलून विहिरीच्या पाण्यात फेकून दिले. प्रेयसीने आरडाओरड केल्यामुळे तिचे कुटुंबिय धावून आले व त्यांनी तिला विहिरीबाहेर काढले. त्यानंतर प्रेयसीने आरोपीविरुद्ध कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. सोनाली राऊत तर, आरोपीतर्फे ॲड. संजय जोगेवार यांनी कामकाज पाहिले.