नागपूर : ‘ रोड रेज ’ वरून सीताबर्डीत भर दुपारी एका तरुणाच्या भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी गुन्हेगारांमध्ये कायद्याचे भय आहे की नाही असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.
दुपारी दोनच्या सुमारास विनय नाविक (१८, वाडी) हा सीताबर्डीतील सैनिक विश्राम गृहासमोरून त्याच्या वाहनाने जात होता. त्यावेळी ऑस्टीन जोसेफ (२०, मरियम नगर) हा बेजबाबदारपणे विनयच्या गाडीसमोर आला. यावरून विनयने त्याला टोकले. यावर जोसेफ संतप्त झाला व त्याने विनयला शिवीगाळ करत मारहाण केली. विनयने त्याचा भाऊ पवन नाविक याला फोन करून या घटनेची माहिती दिली.
पवन त्याच्या मित्रासह घटनास्थळी पोहोचला. त्याचवेळी जोसेफ हा परत तेथे आला व त्याने नाविक बंधूसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पवन जोसेफला समजावत असतानाच आरोपीने स्वत: जवळील चाकू काढला व पवनच्या पोट, पाठीवर वार केला. यात पवन गंभीर जखमी झाला व त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून जोसेफ पळून गेला. विनयने पवनला मेयो इस्पितळात दाखल केले. त्याच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी जोसेफला अटक केली आहे.