नागपूर : रेल्वे गाड्यांमधून घातक साहित्य आणि ज्वलनशिल पदार्थ तसेच चिजवस्तू नेण्यास सक्त मनाई असताना देखिल रेल्वेच्या पार्सल बोगीमधून चक्क गॅस सिलिंडर नेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. हा गैरप्रकार उघड होताच रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शनिवारी रात्री एका तरुणाला अटक केली.
येथील रेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून काही जणांना हाताशी धरून दलाल कोट्यवधींची रोकड, माैल्यवान चिजवस्तू, प्रतिबंधित साहित्य, चिजवस्तू आणि ज्वलनशिल पदार्थ ठिकठिकाणी पाठवित असल्याचा खुलासा लोकमतने दोन आठवड्यांपूर्वी केला होता. त्याची दखल घेत रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात अत्याधुनिक स्कॅनिंग सेटअप लावला. स्कॅनर मशिनमधून स्कॅन केल्याशिवाय कोणतेही सिलबंद पार्सल रेल्वे गाडीत अपलोड करायचे नाही, असा आदेशही मित्तल यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अनेक दलालांनी विरोध करून काही व्यापाऱ्यांना स्कॅनर मशिनच्या विरोधात उकसावणे सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर, शनिवारी एका पार्सलची तपासणी सुरू असताना त्यात गॅस सिलिंडर आणि एक छोटी शिगडी लपवून असल्याचे दिसून आले. आरपीएफचे एएसआय बी. के. सरपाते आणि डी. एस. सिसोदिया यांनी लगेच त्याची दखल घेत चाैकशी सुरू केली. हे पार्सल सचिन पिंपळे ब्रदर्स पॅकिंग मुव्हर्स कार्गोच्या बिलावर १० नग घरगुती सामानाची नोंद करून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नागपूरहून हे प्रतिबंधित सामान पुण्याला जाणार असल्याचेही पुढे आले. त्यामुळे रोहित गणेश बहोरिया (वय ३४, रा. न्यू इंदोरा) याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने आमिषापोटी खोटी माहिती देऊन हे ज्वलनशिल तसेच प्रतिबंधित साहित्य रेल्वेत लोड करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरपीएफने रेल्वे कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. आठवडाभरात दुसरा गैरप्रकारमनाई असताना पार्सलमधून मोठी रोकड अन् प्रतिबंधित चिजवस्तू बाहेर पाठविल्या जात असल्याचे वृत्त 'लोकमत'ने यापूर्वी प्रकाशित केले. त्यानंतरही स्कॅनरला बायपास करून ६० लाख रुपये दलालांनी दुरंतो एक्सप्रेसमधून पार्सलने मुंबईला पाठविले होते. ते मुंबईत पकडल्यानंतर पार्सल विभागात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चाैकशी सुरू असतानाच आता पार्सल विभागातून एका आठवड्यात दुसऱ्यांदा हा गैरप्रकार उघड झाला आहे.