लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पळून जाताना अडवण्यासाठी पुढे सरसावलेल्या हवालदाराला एका तवेराचालकाने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे गिट्टीखदानच्या पोलीस वाहनाला अपघात होऊन त्यात एका एपीआयसह तीन पोलीस जबर जखमी झाले. मानकापूर चौकाजवळ शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास हा थरार घडला. यामुळे शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.गिट्टीखदानचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पी. राऊत हे त्यांच्या सहकाऱ्यांसह गुरुवारी रात्री गस्त करीत होते. शुक्रवारी पहाटे त्यांना हजारीपहाड परिसरात एक लाल रंगाची तवेरा संशयास्पद अवस्थेत दिसली. त्यांनी वाहनचालकाला थांबण्याचा इशारा करताच आरोपीने कार वेगात दामटली. त्यामुळे राऊत यांनी वायरलेस मेसेज करून शहर पोलिसांना आरोपी पळून जात असल्याचा मार्ग सांगितला. ते ऐकून मानकापूरचे पोलीस हवालदार गजानन वाघ चौकात कर्तव्यावर उभे झाले. वाघ यांनी पुढे होऊन समोरून येणाऱ्या तवेराचालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने कार न थांबवता सरळ वाघ यांच्या अंगावर घातली. प्रसंगावधान राखत वाघ यांनी बाजूला उडी मारली. त्यामुळे ते बालंबाल बचावले. गिट्टीखदानचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा आणि नायक चंद्रकांत यादव तसेच शिपायी गजानन आपल्या वाहनाने आरोपींना रोखण्यासाठी पाठलाग करू लागले. पोलिसांचे वाहन जवळ येताच आरोपींनी त्यांना सिनेस्टाईल कट मारला. त्यामुळे पोलिसांचे वाहन बाजूच्या बसवर धडकले आणि गजा, यादव तसेच गजानन हे तिघेही जबर जखमी झाले. पोलिसांच्या वाहनाची (एमएच ३१/ डीझेड ०४०१) मोडतोड झाली. पहाटे ३ च्या सुमारास मानकापूर चौकाजवळ हा थरार घडला. यानंतर आरोपी तवेराचालक व त्याचा साथीदार पळून गेला. आज सकाळपासून या थरारक घटनेची माहिती शहर पोलीस दलात व्हायरल झाली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमी झालेल्या हवालदार वाघ यांच्यावर रविनगर चौकातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असून, अन्य तिघांना सुटी मिळाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले.आरोपी अकोल्याचे ?पोलिसांकडून आरोपींबाबत रात्रीपर्यंत माहिती उघड होऊ शकली नाही. सूत्रांच्या मते आरोपी अकोला जिल्ह्यातील असून, ते चोरटे असावे, असाही अंदाज आहे. दरम्यान, आरोपींच्या तवेराचा क्रमांक एमएच २४ / ५२१६ आहे. मात्र, ती तवेरा कुणाच्या मालकीची आहे, ते स्पष्ट झालेले नाही. तवेरावर लिहिलेला तो क्रमांक खरा की खोटा हे आरोपींच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे.