लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयुक्त मुंढे हा प्रकल्प गुंडाळण्याच्या प्रयत्नात असल्याचा घणाघाती आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे.महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी आयुक्त मुंढे यांना या संदर्भात पत्र पाठविले. या पत्रात महापौरांनी म्हटले आहे की, स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नागपूर केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. मात्र, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात असंंवैधानिक कारभार सुरू आहे. शिस्तप्रिय तुकाराम मुंढे यांच्याकडून हे अपेक्षित नव्हते. या कंपनीचे सीईओ म्हणून रामनाथ सोनवणे कार्यरत होते. १० फेब्रुवारीला त्यांची बदली झाली. त्यानंतर हे पद रिक्त आहे. एनएसएससीडीसीएलमध्ये काय सुरू आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. बुधवारी आम्ही पाच संचालकांनी कंपनीच्या कार्यालयात इन कॅमेरा बैठक घेतली. याचे रेकॉर्डिंग केले. यावेळी धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या व हा प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले. नागपूरचा शिरपेच ठरणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आपण बट्ट्याबोळ करीत आहात असा आरोप संदीप जोशी यांनी या पत्रातून केला आहे.आयुक्तांनी कंपनी सीईओपद बळकावलेएनएसएससीडीसीएल या कंपनीवर संचालकांची नियुक्ती संचालक बोर्डच्या बैठकीत केली जाते. मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कंपनीची बैठक झाली नाही. असे असतानाही आयुक्त कंपनीचे संचालक कसे झालेत, असा सवाल संदीप जोशी यांनी या पत्रातून केला आहे. कंपनीच्या सीईओची नियुक्ती संचालक मंडळाच्या बैठकीत केली जाते परंतु आयुक्तांनी बळजबरीने असंवैधानिकरीत्या सीईओ पद बळकावले आहे. एनएसएससीडीसीएल चेअरमन प्रवीण परदेशी यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांनी मला सीईओपदाची जबाबदारी दिली असे आयुक्त मौखिक सांगत आहेत. परंतु अशा स्वरूपाची नियुक्ती करता येत नाही, असेही जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.महापौरांनी मुंढेंना केलेले प्रश्नट्रान्सफर स्टेशनचा प्रकल्प संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला होता. निविदा प्राप्त झाल्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी रद्द केल्या. तो कोणत्या अधिकारात रद्द केला ?संचालक मंडळाची मंजुरी न घेता ५० कोटीचा निधी बायोमायनिंग करिता आपण कोणत्या अधिकारात खर्च केला ?महेश मोरोणे यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पाठवण्याचा निर्णय महासभेने घेतल्यानंतर त्यांना अतिरिक्त प्रभार देण्याचा निर्णय घेतला कोणत्या अधिकारात घेतला ?मुंढेंकडून अधिकाराचा गैरवारमॅटर्निटी लिव्ह देणे बंधनकारक असताना आयुक्त मुंढे यांनी महिला कर्मचाऱ्यांना ती रजा नाकारली. क्वारंटाईन करण्यात आलेल्या कर्मचाºयांना कामावर बोलावले. मुंढे हे शासनाने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करीत आहेत, असा आरोपही जोशी यांनी मुंढे यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:24 AM
महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयुक्त मुंढे हा प्रकल्प गुंडाळण्याच्या प्रयत्नात असल्याचा घणाघाती आरोप महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर केला आहे.
ठळक मुद्देमहापौर संदीप जोशी यांचा आयुक्त मुंढेवर आरोप