मैत्रिणीच्या खुनाचा प्रयत्न; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 5, 2023 06:43 PM2023-04-05T18:43:30+5:302023-04-05T18:44:25+5:30
Nagpur News बोलणे सोडले म्हणून मैत्रिणीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
राकेश घानोडे
नागपूर : बोलणे सोडले म्हणून मैत्रिणीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुधवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. जे. पी. झपाटे यांनी हा निर्णय दिला. ही घटना राणा प्रतापनगर येथील आहे.
शुभम सुनील मरसकोल्हे (३२), असे आरोपीचे नाव असून तो संत तुकडोजीनगर, टेलिफोन एक्सचेंज येथील रहिवासी आहे. आरोपीची एका तरुणीसोबत मैत्री होती. ते नियमित भेटत व बोलत होते. दरम्यान, आरोपीचे लग्न झाले. त्यानंतरही तरुणीने आरोपीसोबतचे संबंध तोडले नाही. त्यामुळे घटनेच्या दोन महिन्यापूर्वी आरोपीची पत्नी तरुणीच्या घरी गेली व तिच्यासोबत भांडण केले. तिला आरोपीसोबत बोलण्यास मज्जाव केला. परिणामी, जखमी तरुणीने आरोपीसोबत बोलणे सोडले होते. त्यामुळे आरोपी तिच्यावर चिडला होता.
१९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ च्या सुमारास आरोपीने तरुणीच्या घरी धडक दिली. तरुणीने त्याच्याकरिता घराचे दार उघडले नाही. तिने काही वेळानंतर दार उघडले असता आरोपी बळजबरीने घरात शिरला आणि त्याने माझ्यासोबत का बोलत नाही, असा जाब विचारत तरुणीला खाली ढकलले. तिच्या पायावर तलवार मारली. त्यानंतर आरोपीने तिच्या गळ्यावर तलवार मारली असता तिने हात आडवा टाकला. त्यामुळे ती बचावली. तिची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक जमा व्हायला लागल्यामुळे आरोपी घाबरून पळून गेला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सात साक्षीदारांचे जबाब व इतर ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.