लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आरडाओरड करताना हटकले म्हणून एका दारूड्याने त्याच्या पत्नीच्या गळ्यावर एअर गन (छर्ऱ्याची बंदूक) मधून छर्रा झाडून तिच्या हत्येचा प्रयत्न केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐन मकर संक्रातीच्या दिवशी ही घटना घडली. यात ज्योत्स्ना किशोर रामटेके (४५) ही महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपी किशोर हरिश्चंद्र रामटेके (४७) याला अटक केली.
आरोपी किशोर आणि ज्योत्स्ना रामटेके हे दाम्पत्य एमआयडीसीतील माधवनगरीत (गायत्री पार्क) राहतात. ज्योत्स्ना या जिल्हा परिषदेच्या कांद्री (कन्हान) शाळेत शिक्षिका असून, किशोर आरेखक आहे. तो गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करतो. मकर संक्रांतीची सुटी असल्याने तो नागपुरात आला होता. पुरता दारूच्या आहारी गेलेला किशोर गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास वस्तीमध्ये आरडाओरड करीत होता. ते ऐकून ज्योत्स्ना यांनी त्याला हटकले. तो ऐकत नसल्याचे पाहून वैतागाने ज्योत्स्ना घरी आल्या आणि आपल्या शयनकक्षात लेटल्या. तेवढ्यात आरोपी शिवीगाळ करीत घरात आला. त्याने घरातील एअर गन काढली अन् पत्नी ज्योत्स्नाच्या गळ्यावर ताणून फायर केला. छर्रा मानेत शिरल्याने ज्योत्स्ना गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील ज्योत्स्ना यांना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसीचे पोलीस तेथे पोहोचले. ज्योत्स्ना यांचे बयाण रात्री बयाण नोंदविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मुसळे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी किशोरला पत्नीच्या हत्या करण्याच्या आरोपात अटक केली. ज्योत्स्नाची प्रकृती गंभीर असून, तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पंधरवड्यातील दुसरी घटना
एअर गनने जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची दोन आठवड्यातील शहरातील ही दुसरी घटना आहे. गिट्टी खदानमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने एअर गनमधून छर्रा झाडल्याने त्याच्या मित्राचा करुण अंत झाला होता. पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सध्या तो कारागृहात बंद आहे.