नागपूर: बालिकेच्या मागे जाऊन अटेंडन्सने ट्रेनच्या स्वच्छता गृहात तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पाटलीपूत्र एक्सप्रेसमध्ये सोमवारी आणि मंगळवारच्या रात्री दरम्यान ही संतापजनक घटना घडली. यामुळे रेल्वे प्रवाशांचा रोष अनावर झाला आणि त्यांनी आरोपींची बेदम धुलाई केली.
मोहम्मद मुन्ना (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो गया (बिहार) मधील रहिवासी आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो रेल्वेत कोच अटेंडन्स म्हणून काम करतो. बेंगलुरू पटना पाटलीपूत्र एक्सप्रेसच्या एसी थ्री टायरमधील बी- २ कोचमध्ये त्याची ड्युटी होती. या कोचमध्ये एक ७५ वर्षीय वृद्धा, तिची विवाहित मुलगी अन् नात (वय ९) तसेच छोटा नातू यांच्यासह प्रवास करीत होती. ही गाडी नागपूरकडे येत असताना बुटीबोरी स्थानकाजवळ ९ वर्षीय मुलगी बाथरूमला जाण्यासाठी निघाली. यावेळी मध्यरात्री १ ते १.३० ची वेळ झाली होती. कोचमधील बहुतांश प्रवासी झोपले होते.
कोच अटेंडन्स मुन्नाची मुलीकडे नजर गेली आणि त्याच्यातील सैतान जागा झाला. मुलगी बाथरूममध्ये शिरताच तिच्या मागेच असलेल्या आरोपी मुन्ना दार ढकलून बाथरूममध्ये गेला. दाराची कडी आतून लावून घेतल्यानंतर त्याने मुलीचे अंतवस्त्र काढण्याचा प्रयत्न केला. भेदरलेली मुलगी रडत असताना त्याने तिच्याशी नको ते चाळे केले. त्यामुळे त्याचा विरोध करीत मुलगी ओरडू लागली. त्यामुळे आरोपी घाबरला. त्याने तिला पैशाचे आमिष दाखविले. ती आरडाओरड करू लागल्याने त्याने बाथरूमच्या दाराची कडी उघडली. त्याचक्षणी मुलगी बाहेर पळत आली.
दरम्यान, बाथरूमला जाऊन बराच वेळ झाला तरी मुलगी परत आली नसल्याने आई तिची वाटच बघत होती. ती ओरडतच जवळ आल्याने आईने तिला काय झाले, ते विचारले. मुलीने आपबिती कथन करताच संतप्त आईने आरडओरड करीत अन्य प्रवाशांना ही माहिती दिली. अवघ्या ९ वर्षीय बालिकेवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे कळाल्याने आणि आरोपी पुढ्यात असल्याने संतप्त प्रवाशांनी मुन्नाला ओढून बेदम मारहाण केली.
त्याला डब्यातून फेकून देण्याचीही भाषा झाली. मात्र, काही प्रवाशांनी समंजस भूमीका घेऊन रेल्वे सुरक्षा दलाला ही माहिती कळविली. त्यानंतर आरपीएफचे जवान कोचमध्ये पोहचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. ही माहिती रेल्वे पोलीस (जीआरपी)ला देण्यात आली. त्यानंतर नागपूर स्थानकावर गाडी थांबताच जीआरपीने आरोपी मुन्नाला ताब्यात घेतले.पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखलधावत्या ट्रेनमध्ये चिमुरडीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाची माहिती कळताच रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. अनेक अधिकाऱ्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार मनीषा काशिद यांनी पीडित मुलीला विचारपूस केल्यानंतर तिच्या आईची फिर्याद नोंदवून घेतली. त्यावरून पोक्सो (मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा)नुसार गुन्हा दाखल केला. रात्री या प्रकरणात आरोपी मुन्नाला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.