नागपूर : खून प्रकरणातील मयत आरोपीला निर्दोष ठरवण्यासाठी कुटुंबीयांनी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. आरोपीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पुढे चालवलेले सदोष मनुष्यवधाच्या दोषसिद्धीविरुद्धचे अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून खारीज केले. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
किशोर हिंमतराव कराळे असे आरोपीचे नाव होते. तो अमरावती जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या मोर्शी डेपोत कंडक्टर होता. २७ ऑगस्ट २००८ रोजी अमरावती सत्र न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध कराळेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील प्रलंबित असताना कराळेचा मृत्यू झाला. त्यानंतर कराळेला निर्दोष ठरवण्यासाठी त्याची पत्नी वनमाला व इतरांनी ते अपील पुढे चालवले होते.
----------
अशी घडली घटना
मयताचे नाव प्रभाकर बरडे होते. तेही महामंडळाचे कर्मचारी होते. ७ मे २००७ रोजी आरोपीने कामाच्या पाळीवरून प्रभाकरसोबत वाद घातला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर आरोपीने प्रभाकरच्या डाव्या मांडीत चाकू खुपसला. त्यामुळे प्रभाकरचा मृत्यू झाला.
---------------
राज्य सरकारचे अपीलही खारीज
सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष ठरवल्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील २० जानेवारी २००९ रोजी खारीज झाले.