लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीच्या अशोकनगर परिसरात सुनेला घरगुती वादातून सासरच्या व्यक्तींनी रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीररीत्या जळालेल्या सुनेवर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दुर्गा उईके असे गंभीररीत्या जळालेल्या सुनेचे नाव आहे तर आरोपींमध्ये पती विक्की बुद्धेसिंह उईके (३०), सासू आलोकी बुद्धेसिंह उईके (५०) आणि नणंद मथुरा यांचा समावेश आहे. आरोपी विक्कीशी लग्न झाल्यानंतर दुर्गाला दोन मुले झाली. काही दिवसांपासून दुर्गा सोबत सासरची मंडळी विविध कारणांवरून भांडण करीत होते.रविवारी २७ ऑक्टोबरला सासरच्या व्यक्तींसोबत जोरदार भांडण झाल्यामुळे दुर्गा आपल्या मुलांना घेऊन अशोकनगर, गोंड मोहल्ला येथे माहेरी निघून गेली. हे पाहून आरोपी गुरुवारी ३१ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता अशोकनगर येथे तिच्या माहेरी गेले. त्यांनी दुर्गाची आई आणि भावाशी वाद घातला. शिवीगाळ करून मारहाणीवर उतरले. आरोपी विक्कीने दुर्गाचा हात मागून पकडला तर दीर विश्वास याने दुर्गावर रॉकेल टाकून आग लावली. या घटनेत दुर्गा गंभीररीत्या जळाली. तिची आई आणि भाऊही जखमी झाले. दुर्गाच्या बयाणावरून पाचपावली पोलिसांनी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारपीट आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातून भरोसा सेलमध्ये पाठविले प्रकरणकाही दिवसांपूर्वी विक्कीच्या मारहाणीमुळे त्रस्त होऊन दुर्गा पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. ठाण्यातून दोघांनाही भरोसा सेलमध्ये पाठविण्यात आले होते. दोघांची समजूत घालून घरी पाठविण्यात आले. २७ ऑक्टोबरला पुन्हा विक्की आणि दुर्गात भांडण झाले. त्यामुळे ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली.
आम्हाला न्याय द्यादुर्गा गंभीररीत्या जळाल्यानंतर तिचा भाऊ आणि शेजाऱ्यांनी तिला मेयो रुग्णालयात भरती केले. तेथे उपचारादरम्यान दुर्गाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की त्यांचा जावई विक्की, दुर्गाचा दीर विश्वास, नणंद मथुरा आणि सासू आलोकी यांच्यासह आठ व्यक्ती त्यांच्या घरी आले होते. त्यांची मुलगी सासरच्या जाचाला कंटाळून माहेरी राहण्यासाठी आली होती. परंतु आरोपींनी दुर्गाला माहेरी सुखाने राहू दिले नाही. त्यांच्या समोरच मुलीला जिवंत जाळले. आरोपींना कठोर शिक्षा देऊन आम्हाला न्याय द्या, अशी विनवणी तिचा भाऊ आणि आई करीत आहेत. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे.
पती करीत नाही कोणतेच कामआरोपी विक्कीजवळ केरोसीन विक्रीचे लायसन्स होते. परंतु विक्कीने स्व:त केरोसीन विक्री करण्याऐवजी लायसन्स किरायाने दिले होते. त्याचे दुर्गाशी नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले. केवळ लायसन्सच्या भरवशावर विक्की खर्च भागवित होता. दोघांना दोन मुले झाली. सासू आली की घरखर्च भागवित होती. मुले मोठी झाल्यामुळे खर्च वाढत होता. परंतु विक्की दुसरे कोणतेच काम करीत नव्हता. त्यामुळे दुर्गा आणि विक्कीमध्ये नेहमीच वाद होत होता. या वादातून विक्की नेहमीच दुर्गाला मारहाण करीत होता.