लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेलतरोडीतील एका सोसायटीत ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या कोट्यवधींच्या भूखंडांवर हिंगणघाटच्या दोघांनी गुंडांच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. जेसीबीच्या साहाय्याने भूखंडावर टाकलेले वॉल कंपाऊंड तोडले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
अनिलकुमार आत्माराम जवादे आणि यादव खटमल जैस्वानी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. हे दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रहिवासी आहेत.
माैजा बेलतरोडीत भारतीय गृह समस्या निवारण संस्थेने १९८९ पूर्वी ले-आऊट टाकले. निवृत्त प्राचार्य मधुसूदन रामसेवक तिवारी यांच्यासह अनेकांनी तेथे भूखंड विकत घेतले. काहींनी तेथे घर बांधले तर काहींनी वॉल कंपाऊंड टाकून ठेवले. आज या भूखंडांची किंमत करोडोत आहे. १३ जानेवारीला सकाळी तेथे आरोपी अनिलकुमार जवादे तसेच यादव जैस्वानी यांनी आपल्या गुंडांसह धाव घेतली. दोन जेसीबी मशीन आणून तेथे वॉल कंपाऊंडची तोडफोड सुरू केली. भूखंडधारकांना ही बाब कळाल्याने त्यांनी तिकडे धाव घेतली. आरोपी जुमानत नव्हते. त्यांनी भूखंडांची मालकी असणारांनाच धमकावणे सुरू केले. ही जमीन आमची आहे, असे सांगून भूखंड मालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तेथे मोठा तणाव निर्माण झाला. माहिती कळाल्यानंतर बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी तेथे पोलीस ताफा पाठवला. मालकी हक्कावरून वाद घालणाऱ्या दोन्ही गटांतील मंडळींना ठाण्यात आणले. दोघांच्याही कागदपत्रांची तपासणी केली असता आरोपी जवादे आणि जैस्वानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अलीकडे या सोसायटीतील भूखंडाची खरेदी केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तिवारी यांची तक्रार नोंदवून जवादे आणि जैस्वानी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
---
भूखंडधारकांमध्ये भीती
या प्रकारामुळे भूखंडधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न शहरात सुरू आहेत. गिट्टीखदान, मानकापूर, कोराडी, कळमना, हुडकेश्वर, बेलतरोडी, सोनेगाव, हिंगणा, एमआयडीसी आणि वाडी भागात असे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत.
----