पहाटेची घटना : पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेतले नागपूर : काटोल मार्गावरील बाल सुधार गृहात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींनी सुधार गृहातून पलायनाचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. मात्र पलायन केल्याची माहिती मिळताच तत्काळ शोधावर लागलेल्या पोलिसांनी दोन तासातच मुलींना ताब्यात घेतले. या प्रकाराने सुधार गृहात मात्र खळबळ उडाली होती. पलायन करणाऱ्या मुलींमध्ये एका अत्याचार पीडितेचा समावेश असून, अन्य मुली कुटुंबाच्या दबावामुळे सुधार गृहात राहात होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यातील एक-दोन मुली काही दिवसापासून आपल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यांनी इतर सहकाऱ्यांना त्यांची योजना सांगितली व त्यांनीही पलायन करण्यास होकार दिला. घटनेच्या रात्री महिला सुरक्षा रक्षक झोपताच पाच मुलींनी पहाटे ३ वाजताच्या सुमारास सुधार गृहाच्या शौचालयाच्या भिंतीवरून उडी घेऊन बाहेर पडल्या व पळ काढला. यादरम्यान जाग आलेल्या महिला रक्षकांना मुलींनी पळ काढल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच सदर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. झोन क्रमांक २ चे रात्रपाळीतील डीसीपी आर. कलासागर यांच्या नेतृत्वात शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी पहाटे ५ वाजताच्या सुमारास पाचपावलीच्या कडबी चौक परिसरातून मुलींना ताब्यात घेतले. महिला पोलिसांच्या मदतीने त्यांना सदर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या अल्पवयीन मुलींची चौकशी केली असता बालसुधार गृहातील कठोरपणा व घरी जाण्याच्या इच्छेमुळे पलायन केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यातील अत्याचार मुलीने अनेकवेळा असा प्रयत्न केला असून, घरच्यांनी त्रस्त होऊन तिला बाल सुधार गृहात टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून अत्याचार करणारा युवक जामिनावर तुरुंगाबाहेर पडला आहे. त्याबाबत माहिती मिळाल्याने तिने पलायन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर पोलीस स्टेशनच्या महिला पीएसआय पी. एम. शेंडे यांनी मुलींची चौकशी केली असून, त्यांना बालसुधार समितीसमोर सादर केले जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बालसुधार गृहात १०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुली राहतात. यामध्ये घरातून पळालेल्या, बेवारस, गुन्ह्यात अडकलेल्या मुलींचा समावेश आहे. सुधार गृहात एक महिला रक्षक तैनात असून, या भरवशावर सुरक्षा राखणे शक्य नाही. हा परिसर असुरक्षित असल्याने पलायन करणाऱ्या मुलींवर आणखी अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
बाल सुधार गृहातील पाच मुलींचा पलायनाचा प्रयत्न
By admin | Published: January 18, 2017 2:31 AM