नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या (डेंटल) अधिष्ठातापदी मुख शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अधिष्ठातापदाच्या मुलाखतीत त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र गुरुवारी रात्री धडकले. शुक्रवारी प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षणाला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न करेल, असे मत नोंदविले.
डॉ. दातरकर यांनी शासकीय दंत महाविद्यालयातून ‘बीडीएस’ व ‘एमडीएस’ अभ्यासक्रम १९९९ मध्ये पूर्ण केला. याच महाविद्यालयातील मुख शल्यचिकित्सा विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काही दिवस काम पाहिले. त्यानंतर १४ वर्षे शरद पवार डेंटल कॉलेज, सावंगीमध्ये कार्यरत होते. येथे त्यांना सहायक प्राध्यापकापासून ते प्राध्यापकापर्यंत बढती मिळाली. २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन शासकीय दंत महाविद्यालयात मुख शल्यचिकित्सा विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मागील सहा वर्षांत त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासोबतच विद्यार्थ्यांना उच्च दर्जेचे शिक्षण देण्यास पुढाकार घेतला. डॉ. दातारकर हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अकॅडेमिक कौन्सिल विभागाचे सदस्य आहेत, सोबतच विद्यापीठाच्या संशोधन समितीचे सदस्यही आहेत.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. दातारकर म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत संशोधनावर भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. हे संशोधन रुग्णहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरेल, याची काळजीही घेण्यात येईल. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम लवकर पूर्ण करून त्याचे कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न राहील. शासकीय दंत महाविद्यालयाला ‘नॅक’चा दर्जा मिळण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णांवर अद्ययावत उपचार व कौशल्यप्राप्त डॉक्टर घडविण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.