नागपूर : प्लॉटची डिमांड आणि टॅक्स काढून देतो, अशी थाप मारून एका आरोपीने महिलेचा प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केला. पंकज वैद्य असे आरोपीचे नाव असून, तो रामबाग परिसरात राहतो.
शीलगंधा सोपानराव पाटील (वय ६०) या चंदननगरमध्ये राहतात. आरोपी पंकजसोबत त्यांची ओळख आहे. शीलगंधा यांच्या वडिलांनी मानेवाड्यात एक प्लॉट घेऊन ठेवला आहे. त्याचा टॅक्स आणि डिमांड काढून देतो, अशी थाप मारून आरोपी पंकजने शीलगंधा यांच्याकडून प्लॉटची मूळ कागदपत्रे घेतली. त्यांना अंधारात ठेवून शीलगंधा यांच्या आईच्या ॲग्रिमेंटवर सह्या घेतल्या आणि वडिलांच्या बनावट सह्या करून तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न केला. २००८ ते २०१८ दरम्यान पंकज वैद्य याने ही बनवाबनवी केली. ती लक्षात आल्यानंतर शीलगंधा पाटील यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चौकशी सुरू आहे.
---
नफ्याचे आमिष दाखवून २१ लाख हडपले
नागपूर : अल्पावधीत लाखोंच्या नफ्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी महेश प्रभुदयाल अग्रवाल या गांधीबाग मधील व्यापाऱ्याला २१ लाखांचा गंडा घातला. सुयेक देवतळे आणि शैलेश भारद्वाज अशी आरोपींची नावे आहेत. देवतळे श्रीकृष्णनगरात तर भारद्वाज, वर्मा ले-आऊट अंबाझरी येथे राहतो.
या दोघांनी पारिन कंपनीत रक्कम गुंतवायला लावून तसेच कंपनीचे रॉ -मटेरियल विकत घेण्यास भाग पाडून अग्रवाल यांच्याकडून २० लाख ८७ हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात ठरल्याप्रमाणे अग्रवाल यांना एकही रुपयाचा मुनाफा दिला नाही. उलट त्यांनी विकत घेतलेला माल परस्पर दुसऱ्यांना विकून अग्रवाल यांची फसवणूक केली. मंगळवारी दुपारी अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी देवतळे आणि भारद्वाज यांची चौकशी केली जात आहे.
---