नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. त्यात आज एका पोलीस हवालदाराला बाधा असल्याच्या संशयावरून इस्पितळात भरती करण्यात आले असून, ११ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडालीे आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा आधारच काढून घेण्याचा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.नागरिकांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. नागपुरातील रेडझोन ठरलेल्या भागात २४ तास गस्त केली जात आहे शिवाय विविध पॉर्इंटवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सलग कर्तव्यावर हजर राहावे लागत असल्याने पोलिसांना शारीरिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांची एकूण संख्या आणि नागपुरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दोन हजार होमगार्ड त्यांच्या मदतीला देण्याचे ठरले होते. मात्र नंतर हा आकडा एक हजारावर आला. त्यातून एप्रिल महिन्यात पुन्हा काही होमगार्ड कमी करण्यात आले. ३० एप्रिल पर्यंत ६०० ते ८०० होमगार्ड नागपूर पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तावर तैनात होते. त्यांच्या मदतीने पोलीस बंदोबस्ताचे कर्तव्य चोखपणे बजावत होते. मात्र, या होमगार्डचे मानधन कुण्या निधीतून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न गुंतागुंतीचा ठरला. होमगार्डसना मानधन मिळेना असे झाल्याने त्यांनीही कुटुंबाची भूक शमविण्यासाठी दुसरीकडे रोजगार शोधण्याचे प्रयत्न केले. आणीबाणीची वेळ असताना या होमगार्डचे मानधन पोलीस कल्याण निधी अथवा कोणत्याही विभागाच्या निधीतून काढून देणे गरजेचे असताना मानधनाचा प्रश्न लालफितीत अडकला. त्यामुळेच नागपुरातील ४५१ होमगार्ड ३ मे पासून कमी करण्यात आले. त्यामुळे पोलीस दलांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण वाढला आहे.तोंड दाबून बुक्क्यांचा मारप्रकरण पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात अडकून पडल्यामुळे आणि शिस्तीच्या पोलीस दलात काही बोलणेही शक्य नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापलिकडे आता पोलिसांना पर्याय उरला नाही.महिन्याला एक कोटीचा खर्चया संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कुणीही अधिकृतपणे यावर बोलायला तयार नाही. एका होमगार्डसाठी रोज ६७० रुपयांचा खर्च होतो. अर्थात नागपुरात ४५१ होमगार्डसवर दर दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त खर्च होतो. महिन्याला तो खर्च १ कोटीच्या घरात पोहोचतो.