नागपूर : देशाच्या कुठल्याही राज्यात अंमली पदार्थांचा साठा आढळला की लगेच त्याची गोव्याशी लिंक जोडण्याचा प्रयत्न होतो. संबंधित ड्रग्ज गोव्यातच जात असल्याचा तथ्यहीन दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात गोव्यात अंमली पदार्थ तस्करीचे कंबरडे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही जणांकडून अंमली पदार्थांच्या नावाखाली गोव्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. नागपुरात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
भाजपने महिला, शेतकरी, तरुण व गरीबांना डोळ्यासमोर ठेवूनच लोकहितार्थ योजना राबविल्या व हेच आमच्या कार्याचे स्तंभ होते. कॉंग्रेसने मात्र नेहमी तरुणांना ‘हात’ दाखविण्याचेच काम केले. त्यांच्याकडे संधी असतानादेखील त्यांनी देशाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. सातत्याने त्यांनी जातधर्माच्या नावाखाली वितुष्ट निर्माण करणारेच राजकारण केले, असे सावंत म्हणाले.
भाजपकडून संविधानाच्या मार्गावर चालतच देशाला समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कॉंग्रेसकडून संविधान संपुष्टात येईल असा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यांचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे असे वक्तव्य करत असून त्यांचा निषेध करतो असेदेखील सावंत म्हणाले. यावेळी सावंत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’चे समर्थन केले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंबाबतदेखील भाष्य केले. सुप्रिया सुळे घरातील वादातच इतक्या अडकल्या आहेत की त्या काय बोलत आहेत हेच त्यांना कळत नाही, असा चिमटा सावंत यांनी काढला.