चर्चासत्र : तज्ज्ञांनी दिली भारतीय तंत्रज्ञानाची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील कापूस उत्पादन आणि वस्त्रोद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी इथिओपिया येथील एका शिष्टमंडळाने शासकीय तंत्रनिकेतनमधील वस्त्रोद्योग विभागाला भेट दिली. इथिओपिया येथे वस्त्रोद्योग झपाट्याने विकसित होत आहे. त्याकरिता भारतीय तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी या शिष्टमंडळाने विदर्भ दौरा केला. या शिष्टमंडळात इथिओपिया सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातील उच्च अधिकारी, वस्त्रोद्योग संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. शिवाय यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात, आरएसआर मोहता स्पिनिंगचे अध्यक्ष आर. एन. यादव, अंकूर सिड्सचे सल्लागार डॉ. एस. एम. येवले, युवा ग्रामीण संघटनेचे महासंचालक दत्ता पाटील, सीआयटीआयचे प्रकल्प संचालक गोविंद वैराळे, नीम फाऊंडेशनचे लक्ष्मीकांत पडोळे, जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगच्या वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक संदीप सोनी, वस्त्रोद्योग सल्लागार श्रीकांत गाडगे, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाचे महाव्यवस्थापक जे. पी. महाजन, नागपूर गारमेंट उद्योजक संघटनेचे माजी अध्यक्ष देबाशिष घोष, वस्त्रोद्योग संघटनेचे सचिव डॉ. हेमंत सोनारे, तंत्रनिकेतनच्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रमुख दीपक कुलकर्णी, डॉ. संजीव मुत्तगी, डॉ. चंदुराज कापसे, प्रा. शरद गायकवाड व प्रा. लिपिका चक्रवर्ती प्रामुख्याने उपस्थित होत्या. या शिष्टमंडळाच्या दौऱ्या निमित्त तंत्रनिकेतमध्ये आयोजित चर्चासत्रात भारतातील कापूस शेती, येथील कापसावरील प्रक्रिया उद्योग आणि कापड निर्मितीबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. शिवाय यावेळी इथिओपिया येथील सद्यस्थितीतील वस्त्रोद्योग आणि तेथील उद्योगांना भारतीय उद्योगाकडून तंत्रज्ञान साहाय्याच्या अपेक्षा यावरही चर्चा करण्यात आली. सुरुवातीला तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी. एस. थोरात यांनी संस्थेची सविस्तर माहिती दिली. तसेच दीपक कुलकर्णी यांनी बैठकीची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी ते म्हणाले, मागील काही वर्षात विदर्भात कापूस उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता याबाबत बरीच प्रगती झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वस्त्रोद्योग शिष्टमंडळाची शासकीय तंत्रनिकेतनला भेट
By admin | Published: May 18, 2017 2:36 AM